देशाचे पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर पं. नेहरूंनी इंग्लंडला भेट दिली, तेव्हा चर्चिल हे त्या देशाच्या पंतप्रधानपदावर दुसऱ्यांदा विराजमान झाले होते. नेहरूंसोबत इंदिरा गांधीही होत्या. आपल्या पहिल्याच भेटीत इंदिरा गांधींना चर्चिल म्हणाले, ‘‘तुमच्या वडिलांना आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांना मी अनेक वर्षे तुरुंगात डांबले होते. तुमच्या मनातला त्याचा राग आता संपला की नाही?’’... एका क्षणाचाही विचार न करता इंदिरा गांधींनी त्यांना उत्तर दिले, ‘‘आम्ही गांधीजींचे अनुयायी आहोत. त्यांनी आमच्यावर राग, द्वेष वा सूडाचा संस्कार केला नाही...’’- इंदिरा गांधींचे ते उत्तर चर्चिल यांना नक्कीच आवडले नसणार, कारण गांधींचा केला तेवढा तिरस्कार आणि राग चर्चिल यांनी दुसऱ्या कोणाचा केला नाही.
त्याआधी 1945 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेच्या सोहळ्याला भारतीय प्रतिनिधी मंडळाच्या प्रमुख म्हणून विजयालक्ष्मी पंडित उपस्थित होत्या. त्यांच्या शेजारच्याच खुर्चीवर चर्चिल बसले होते. कोणतीही पूर्वसूचना न देता चर्चिल त्यांना म्हणाले, ‘‘तुमच्या पतीला आम्हीच मारले, नाही का?’’ (विजयालक्ष्मींचे पती रणजित पंडित हे स्वातंत्र्य- लढ्यातील सहभागासाठी ब्रिटिशांच्या तुरुंगात असतानाच मृत्यू पावले होते.) विजयालक्ष्मी म्हणाल्या, ‘‘प्रत्येकाच्या मृत्यूचा क्षण ठरलेला असतो. तो कोणामुळे येत नाही आणि टळत नाही. त्यांच्या मृत्यूचे ओझे तुम्ही मनावर बाळगू नका.’’ चर्चिल त्याही वेळी अवाक् झाले होते. भारतीय माणसे गीता आणि गांधी यांच्यामुळे एवढी प्रभावित झाली असतील, हे त्यांच्या स्वप्नातही कधी आले नव्हते. त्या खेपेला एक गोष्ट मात्र त्यांनी मान्य केली. ते विजयालक्ष्मींना म्हणाले, ‘‘तुमचे भाऊ हे फार थोर नेते आहेत. त्यांनी माणुसकीच्या दोन शत्रूंना जिंकले आहे- राग आणि द्वेष. असा भाऊ तुम्हाला मिळाला म्हणून तुमचे
अभिनंदन.’’