A message in its most general meaning is an object of communication. It is something which provides information or message; it can also be this information or message itself.
Showing posts with label Maharashtra. Show all posts
Showing posts with label Maharashtra. Show all posts
गावकरी
गावकरी : काय रे गावच्या यात्रेला येतोस का गावी?
नोकरीवाला : नाय हो! रजा जास्त झाल्यात पहिल्या दिवशी येईल, नंतर जमेल असे वाटत नाही.
गावकरी : काय रे! होळीला येतोयस का गावी?
नोकरीवाला : पोरांना सुट्टी नाय हो! उगीच शाळा कशाला बुडवायची.
गावकरी : काय रे! दसऱ्याला येतोयस का गावी?
नोकरीवाला : नाय हो! तब्येत बरी नाय नाय जमणार.
गावकरी : काय रे! दिवाळीला येतोयस का गावी?
नोकरीवाला : आलो असतो पण ऑफिस मध्ये एकटाच आहे.
गावकरी : काय रे! या वर्षी कुणाच्याच लग्नाला आलास नाही?
नोकरीवाला : आई-बाबा आहेत ना ही पण म्हणाली सगळीच कशाला, मग नाही आलो.
गावकरी : अरे! त्या दिवशी मयतावर आलास नाही?
नोकरीवाला : निघालो होतो पण ट्रॅफिक इतकी होती की, मौत भेटलीच नसती.
गावकरी : अरे! यंदा आवणीला येशील ना?
नोकरीवाला : साहेबानी सांगितलय, रविवारी पण कामावर यायला लागेल.
गावकरी(फोनवरुन) :
अरे! ऐकलस, काय! विमानतळमध्ये गेलेल्या जमिनी नोटीस आल्यात, पंधरा दिवसात पैसे भेटणार आहेत पण सहीसाठी यायला जमेल काय तुला, दादा पण यायला निघालाय?
नोकरीवाला :
दहा मिनिटांत ऑफिस मधुन निघतो, एकटाच आलो तरी चालेल की सगळी येऊ! दादाला सांग दोन तासात पोहोचतो आणि हो मोठ्याबाबांना विचार घरी येऊ का डायरेक्ट तहसीलदार ऑफिसला येऊ. मी पंधरा दिवसाची रजा टाकूनच येतो?
'विनोदाचा भाग बाजूला ठेवा पण ही सत्य परिस्थिती आहे.'
लोकांमध्ये Professionalism आणि स्वार्थ इतका वाढलाय की आपलं गाव, गावपण, जुन्या रीती, भुतकाळ, परंपरा गुंडाळून ठेवल्या जात आहेत.
जरूर विचार करा आणि बदल घडवुन आणण्यासाठी प्रयत्न करुया.
अध्यात्मिकांची बुवाबाजी (मनोगते)
साधारणपणे स्वामी समर्थ, गुळवणी महाराज, काडसिद्धेश्वर महाराज, टेंबे स्वामी, गजानन महाराज, पिठले महाराज, शिर्डीचे साईबाबा, यांच्या ठोस जन्म तारखेविषयी कोणी भक्तगँग सांगू शकेल काय?
ज्ञानेश्वर, तुकाराम, गाडगेबाबा, तुकडोजी या संतांच्या जन्म तारखा, ग्रंथ, त्यांचे साहित्य, त्यांचे प्रबोधन कार्य याचे पुरावे उपलब्ध आहेत. महावीर, गौतम बुद्ध, शंकराचार्य, मोहम्मद पैगंबर, गुरू नानक, येशू ख्रिस्त यांचे पण जन्मदिवस, ग्रंथ, त्यांचे कार्य त्यांच्या कार्याचा चिकित्सक अभ्यास उपलब्ध आहे.
तुकारामांचे आडनाव अंबिले होते. देहू येथील ते सावकार होते, वगैरे व्यवहारिक माहिती आहे. भास्कराचार्यांनी शून्याचा शोध लावला, याचे दाखले आहेत.
पण...
या तथाकथित महाराज, स्वामींनी काय केले? स्वामी समर्थ यांच्याविषयी पोथी व्यतिरिक्त कोणताही पूरावा नाही. स्वामी समर्थांचे मूळ नाव, आई वडिल असा कोणताही उल्लेख कुठेही
नाही. ते करदळीवनात प्रगटले म्हणे! ही गोष्ट पूर्णपणे अनैसर्गिक म्हणून धादांत खोटी आहे. स्वामी समर्थांचा कालखंड साधारण १८६० ते १९३० असा काहीसा असावा, कारण पोथीमधे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके त्यांना एकदाच भेटल्याचा उल्लेख आहे. स्वामी समर्थांचे कार्य काय हा समाजशास्त्रीय प्रश्न आहेच. त्यांनी एक जागा/भूखंड पिशाच्च मुक्त केला. मुळात अतिंद्रिय शक्ती, मेल्यानंतरचा आत्मा वगैरे काही अस्तित्वातच नसते. त्यामुळे जागा पिशाच्चमुक्त केली, हे थोतांड आहे. क्षणभर सत्य मानले तरी प्रश्न येतो की, जागा पिशाच्च मुक्त केली; तर देश इंग्रजमुक्त का केला नाही? इंग्रज ही माणसे होती, म्हणजे पिशाच्चापेक्षा कमी शक्तिशाली.
क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांना भेटायला गेले हे पण काल्पनिक वाटते. कारण फडके भेटायला गेल्याचा उल्लेख फक्त पोथीत आहे. तो काही ऐतिहासिक दस्तऐवज म्हणता येत नाही. तरीपण मान्य करु की, फडके स्वामी समर्थांना भेटले, आणि फडके म्हणाले की, स्वातंत्र्यासाठी फडक्यांनी लढायचे ठरवले आहे. त्यावर स्वामींनी त्यांना आत्ता लढून उपयोग नाही, स्वातंत्र्याची वेळ आली नाही, असे सांगितले म्हणे! हेही त्या पोथीत आहे.
आता प्रश्न येतो की,
१) जर वेळ आल्यावर लढायचे म्हणजे १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले, मग १९४६ पासून लढायला पाहिजे होते का?
२) वेळ आल्यावर स्वातंत्र्य मिळेल, मग लढायचे तरी कशाला?
हाच प्रश्न पिठले महाराज, गुळवणी महाराज, काड सिद्धेश्वर महाराज यांच्याबाबत येतो. या बाबा लोकांनी म्हणे कुंडलिनी जागृत केली! मुळात आधुनिक वैद्यक शास्त्रात कुंडलिनी वगैरे काही अस्तित्वात नसतेच. शरीर रचनाशास्त्र यात अंत्य नाडी, कुंडलिनी याचा उल्लेख नाही. तरीपण मान्य करु की, कुंडलिनी जागृत केली. पण उपयोग काय? जीवनाच्या कोणत्या क्षेत्रात हे भरीव कार्य झाले, ज्यामुळे मानवी समाज प्रगतीच्या पुढच्या टप्पयावर गेला...?
अजब-गजब जन्मकथा.
विभांडक ॠषी आणि हरीणी यांच्या मिलनातून शृंग ॠषी जन्माला आला.
नदीवर स्नान करणाऱ्या अप्सरेला पाहून भारद्वाजॠषीचा विर्यपात झाला. ते विर्य द्रोणात साठविल्यावर त्यातून द्रोणाचार्य जन्मला.
हनुमानचा घाम मगरीने गिळला, तिला मकरध्वज नावाचा मुलगा झाला. मुळात अंडे देणाऱ्या मगरीने मूल कसे जन्माला घातले?
अल्पवयीन मत्सगंधेवर पराशर ऋषीने बलात्कार केल्यामुळे त्यातून व्यास ऋषी जन्माला आला.
अप्सरेला पाहून सरदवान ऋषीचा गवतावर विर्यपात झाला. त्या विर्यापासून कृपाचार्य जन्माला आला.
अप्सरेला पाहून वरुण व मित्र यांचे विर्यपात झाले. त्या दोघांचे विर्य एका भांड्यात साठविल्यावर त्यातून अगस्ती ऋषी व वशिष्ठ ऋषी जन्माला आले.
असे होते शीघ्रपतन होणारे वासनांध ऋषी!
या जन्मकथा वाचल्यावर पुराणे म्हणजे चांदोबातील बालबुद्धी टाईप भाकड कथांची भारताड पिवळी पुस्तके आहेत, हेच सिद्ध होते.
जेट जगदीश
संत गाडगेबाबा
संत गाडगेबाबा – बालपण
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले.त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा.
ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.
संत गाडगेबाबा – गाडगे महाराज
गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय आणि सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी परिट होते.
अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा विरोध, कीर्तनाव्दारे लोक जागृती. चोरी करू नका, कर्ज काढू नका, व्यसनाच्या अधीन होऊनका. देवा-धर्माच्या नावाने प्राण्यांची हत्या करू नका, अस्पृश्यता पाळू नका.गोधडेबुवा, चिंधे बुवा, लोटके महाराज या नावाने प्रसिध्द. कीर्तनातून लोकजागृती. महाराष्ट्र समाजाचे व्यासपीठ स्वच्छता, प्रामाणिकपणा व भूतद्या यावर भर. देव दगड-धोंडयात नसून माणसात आहे. गादी वा मठ न स्थापणे.
संत मालिकेतील पहिले संत ज्ञानेश्वर होत. संत मालिकेचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला. नामदेवांनी त्याचा भारतभर विस्तार केला. नाथांनी त्यावर इमारत बांधली व तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. उरलेले कार्य गाडगेबाबांनी सिध्दीस नेले. म्हणूनच संत गाडगेबाबा हे संत मालिकेतील ‘शिरोमणी‘ म्हणून ओळखले जातात. मागील संतानी जो मार्ग दाखविला, त्यावर चालण्याचे काम गाडगेबाबांनी केले, समाजात धर्माच्या नावाखाली होत असलेला अन्याय, अत्याचार, अनीती दूर करण्यासाठी ते जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत झगडले. त्यांनी ५०-६० वर्षे महाराष्ट्राची निस्वार्थ बुध्दीने सेवा केली.
महाराष्ट्र ही संतांची पुण्यभूमी आहे. अशा या पुण्यभूमीत अनेक संत-महात्मे होऊन गेले. संत गाडगेबाबा हे त्यापकी एक. समस्त मानवजातीची सेवाभावी वृत्तीने निरपेक्ष सेवा करून त्यांना अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी आणि परंपरा यांच्या जोखडातून बाहेर काढण्याचे महान कार्य त्यांनी केले. एक थोर समाजसेवक व क्रांतिकारक राष्ट्रीय संत- ज्यांनी प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन ‘स्वच्छते’चा महामंत्र संपूर्ण देशाला दिला.
विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांना अस्वछता बघून खूप वाईट वाटे. त्यामुळे कीर्तनाच्या निमित्ताने जिथे जिथे जात तिथे प्रथम झाडू मागवून घेत आणि गाडगेबाबा व त्यांचे अनुयायी स्वत: हातात झाडू घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करीत आणि मगच कीर्तनाला सुरुवात करीत. अशा या महान पुरुषाने राबविलेल्या मोहिमेची दखल आपल्या राज्य-शासनाला घ्यावी लागली. त्यांच्या नावाने ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान’ राज्यस्तरीय मोहीम कार्यरत आहे.
आपल्या संपूर्ण जीवनात तत्कालीन धर्ममरतडांकडून हेटाळणी व अपमान सहन केले. भोवतालच्या समाजासाठी आध्यात्मिक कीर्तनातून ज्ञानगंगा गावोगावी पोहोचविणारे संत गाडगेबाबा ही एक बाजू आत्तापर्यंत आपल्या सर्वाना माहीत आहे. परंतु नवनिर्माणाचे भान असलेला एक युगप्रवर्तक ‘वास्तुनिर्मितीकार संत गाडगेबाबा’ यांची ही अज्ञात बाजू जाणून घेऊ.
हल्लीच्या युगात, गावोगावी व शहरातून ठिकठिकाणी, विशेषकरून पदपथावर देवळे बांधण्याची चढाओढ लागलेली दिसून येते. परंतु गाडगेबाबांनी तसे न करता राज्यातील प्रमुख शहरांत व तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया, गोरक्षण, अंध-अपंगांसाठी सदावर्त, मुलांसाठी शाळा-कॉलेज व वसतिगृहे बांधून सर्वसामान्य जनतेची सोय केली यातच त्यांचे मोठेपण सिद्ध होते
संत गाडगेबाबा – कार्य
१९०८ : मध्ये पुर्णा नदीवर घाटाचे निर्माण केले.
१९२५ : मुर्तीजापूर येथे गोरक्षण , धर्मशाळा व विद्यालयाचे निर्माण केले.
१९१७ : पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण गाडगेमहाराजांनी केले. मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही“ असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
फेब्रुवारी ८,इ.स. १९५२ रोजी ‘श्री गाडगेबाबा मिशन‘ स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या. गाडगे महाराज जातीने परिट व गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.
१९३२ : ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले. गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला. “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला“ हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते. आचार्य अत्रे गाडगेबाबां बद्दल म्हणतात ‘सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात‘
१९३१ : वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
१९५४ : जे.जे. हॉस्पिटल धर्मशाळा ( मुंबई) बांधली. गाडगे बाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती. डॉ आंबेडकर सुद्धा त्यांना गुरू स्थानी मानत असत.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
तत्कालीन नागपूर विद्यापिठाचे विभाजन करुन दि 1 मे 1983 रोजी या विद्यापिठाची स्थापना झाली. सुरवातीला या विद्यापिठाचे नाव अमरावती विद्यापिठ असे होते. नंतर महाराष्टातील थोर संत व समाजसुधारक गाडगेबाबा यांचे नाव या विद्यापिठास देण्यात आले. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम हे पाच जिल्हे या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.
गाडगे महाराज यांची एक सुंदर कविता
‘काय करून ऱ्हायला रे ?’
‘न्हायी जी नवस फेडून राहिलो, म्या म्हन्ल माह पोरग ठीक झालं की कोंबड कापीन !’
‘अरे कोंबड कुनाच लेकरू हाय ?’
‘देवाचच लेकरू हाय !’
‘आन तूह लेकरू ?’
‘माह व्ह्य ना जी !’
‘आन तू कोनाचा रे ?’
‘मी माह्या बापाचा न जी !’
‘म्हन्जे शेवटी कोनाचा ?
‘देवाचं लेकरू !’
‘मंग तूह लेकरू बी देवाचच न ?
‘हो जी !’
अरे तूच त म्हनते कोंबड बी देवाचं लेकरू आणि तूह बी देवाचं लेकरू . आणि आताच मला सांगत होतास की कोंबड कापलं की देव प्रसन्न होते तूह पोरग बी देवाचं लेकरू है … काप त्याले आणि घे देवाले प्रसन्न करून ! … असं म्हटल्यावर लोकांच्या अंगावर शहारे येत असत आणि त्यांना कोंबड कापायची हिम्मत देखील होत नसे.
पुरस्कार
गाडगेबाबा यांच्या नावाने ग्राम स्वच्छता अभियान चालवले जाते. त्यांच्या नावाने काही पुरस्कारही देण्यात येतात.
१. महाराष्ट्र सरकारतर्फे गाडगेबाबा निर्मल ग्राम पुरस्कार
२. पिंपरी शहर लॉन्ड्री संघटनेचे (अ) राष्ट्रसंत गाडगेबाबा सामाजिक जाणीव पुरस्कार.(ब) राष्ट्रसंत गाडगेबाबा युवा समाजभूषण पुरस्कार.
मृत्यू
२० डिसेंबर १९५६ रोजी वलगाव (अमरावती) येथे मृत्यू.
गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.
कॉम्रेड पानसरेंनी सांगितलेला शिवाजी
" माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा गुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे.समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते. अशा नाट्यमय घटनांवर लक्ष खिळून राहिले म्हणजे मग खरे कर्तृत्त्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो, " नरहर कुरुंदकरांनी शिवाजी महाराजांच्या संदर्भात काढलेले हे उदगार शिवाजी महाराजांसह अनेक नेत्यांबाबत कमी अधिक प्रमाणात सत्य आहेत. आणि म्हणूनच शिवरायांवर आपण लादलेल्या देवत्वापलिकडे जावून आपणाला त्यांचे कार्य समजावून घेण्याची गरज आहे. या दृष्टीने कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहलेले ‘ शिवाजी कोण होता?’ , हे छोटेसे पुस्तिकावजा पुस्तक महत्वाचे आहे. पुस्तकाच्या नावापासूनच पानसरे यांची मांडणी सुरु होते. ‘ शिवाजी कोण होता?’ असा शिवाजीचा एकेरी उल्लेख पानसरे करतात तेव्हा ते शिवाजीचा अनादर करत नाहीत तर शिवाजीला माणसाच्या पातळीवर आणून त्याच्याभोवती असलेले देवत्व आणि अवताराचे अनाठायी वलय सहजी भेदतात. असा शिवाजी आपला असतो, अगदी जवळचा असतो.
भारत हे एक सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र आहे. लोकशाही ही राजकीय प्रणाली आपण अंगिकारिली आहे. आणि असं असतानाही आजच्या या लोकशाही समाजात वावरतानाही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्द्ल प्रचंड आदर आहे. आजच्या आधुनिक समाजाच्या आदर्शांपैकी ते एक आहेत. खरं म्हणजे, शिवाजी महाराज हे राजे होते. ते काही आजच्या सारखे लोकनियुक्त राष्ट्रप्रमुख नव्हते. राजेशाही ही व्यवस्था म्हणून आपण नाकारली आहे पण शिवराय मात्र आजही आपणां सर्वांना परमप्रिय आहेत. सुमारे साडे तीनशे वर्षांपूवी जन्मलेल्या शिवरायांचे गारुड आजच्या लोकशाही व्यवस्थेत वावरतानाही आपल्या मनावर का आहे ? कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहलेले ‘ शिवाजी कोण होता ?’ हे पुस्तक वाचताना या प्रश्नांची उत्तरे मिळत जातात. आणि महत्वाचे म्हणजे खरा शिवाजी कळत जातो. महाराजांमधील नक्की कोणत्या गुणवैशिष्ट्यांना आपण अंगिकारले पाहिजे, याची जाणीवही हे छोटेखानी पुस्तक करुन देते.
खरं म्हणजे तीन चारशे वर्षांपूर्वीच्या राजेशाही – सरंजामशाही व्यवस्थेत राजे येत असत आणि जात असत, सर्वसामान्यांच्या जगण्यात काही फरक पडत नसे. हे सांगताना पानसरे यांनी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी ‘ महिकावतीची बखर’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत जे म्हटले आहे ते उध्दृत केले आहे , ‘ गेल्या तीन हजार वर्षात हिंदुस्थानात जी काही देशी आणि परदेशी सरकारे होऊन गेली ती सारी पोटभरु चोरांची झाली. आणि सरकार म्हणजे उपटसुंभ चोरांची टोळी अशी गावक-यांची अंतःस्थ प्रामाणिक समजूत असे.’ याच स्वरुपाचा कार्ल मार्क्सचाही दाखला पानसरे देतात. असे असताना शिवाजी बाबत मात्र वेगळे कसे घडले ? या राजासाठी खेड्यापाड्यातील लोक जीव द्यायला देखील तयार होते. शिवरायांचे वेगळेपण नेमके कशात होते ?
आजच्या लोकशाहीच्या थांब्यावरुन शिवाजी महाराजांकडे विश्लेषक दृष्टीने पाहताना त्यांच्या रुपाने आपल्या वारशाचा मथितार्थ आपल्याला कळू शकेल. अर्थात तो नेमक्यापणे कळण्यासाठी रुढ इतिहासाने, धूर्त इतिहासकारांनी देऊ केलेले चष्मे आपण नाकारले पाहिजेत, आणि आपल्या स्वतःच्या निखळ नजरेने काळाच्या या बुरुजावर उभे राहून शिवाजी नावाच्या भूतकाळाकडे नव्याने पाहिले पाहिजे.
शिवाजी महाराजांचे वेगळेपण -
शिवाजी राजांचे वेगळेपण हे की त्यांनी आयत्या पीठावर रेघोटया मारल्या नाहीत. स्वराज्य त्यांनी स्वतः स्थापन केले. स्वतःच्या आणि आपल्या जीवाला जीव देणा-या मित्रांच्या, सहका-यांच्या मदतीने ते वाढविले, राखले. आजच्या युगात शिवाजी समजून घेताना घराणे आणि कुळाच्या मोठेपणात अडकलेल्या सगळ्यांनी शिवाजी नावाच्या माणसाचे हे वेगळेपण समजावून घेतले पाहिजे.
" कुळ माझे मोठे,जात माझी मोठी
बढाई असली,नको मारु खोटी
तुझे कर्म तुझा,ठरविते भाव
जात कुळगोत्र,नको आणू आव
तथागत म्हणे,समान सगळे
श्रेष्ठ कनिष्ठ ना,कुणी ना वेगळे
कर्म तुझे सांगे,तुझे खरे मोल
कुळ,गोत्र,जात,वल्गना या फोल " ( धम्मधारा - प्रदीप आवटे)
तथागत गौतम बुध्दाच्या विचारांचे मूर्तिमंत प्रतिबिंब आपल्याला शिवाजी राजांच्या चरित्रात दिसून येते. शिवाजी महाराजांचा जयजयकार करताना पारंपारिक सरंजामशाही व्यवस्थेला प्रखर विरोध करण्याची हिंमत म्हणून तर असायला हवी. शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापन केले हे जसे त्यांचे वेगळेपण आहे तसेच हे राज्य स्थापन करण्यामागील त्यांचा हेतूही केवळ स्वतःची महत्वाकांक्षा तडीस नेण्याचा नव्हता. स्वराज्य स्थापनेमागील त्यांचा हेतू लोककल्याणकारी होता. त्याकाळीच्या इतर राजांप्रमाणे केवळ स्वतःच्या तुंबडया भरणे, त्यांच्या गावीही नव्हते.
शिवाजी - रयतेचा राजा
शिवाजी महाराज हे मध्ययुगीन महाराष्ट्रातील खरेखुरे रयतेचे राजे होते. त्यांच्यापूर्वी अनेक राजे आले गेले तरी लोकांचे जे प्रेम महाराजांना मिळाले ते इतरांना मिळाले नाही, याचे कारण शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराच्या पध्दतीत होते. त्या काळी गावोगावी कुलकर्णी, देशमुख, देसाई, पाटील , खोत, मिरासदार, देशपांडे असे वतनदार लोक होते. राजा कुणीही असला तरी गावोगावी खरे राज्य असे ते या वतनदारांचे ! शेतक-यांकडून हवा तसा अगदी दहा दहा पट सारा वसूल करणे, तो सरकारातही जमा न करता ऐषोराम करणे, हे वतनदार वर्गाचे सर्वसाधारण चारित्र्य होते.
या अन्याय्य सामाजिक सांगाडयाला हात घालण्याचे धाडस राज्यकर्ता म्हणून शिवाजी महाराजांनी दाखवले. त्यांनी शेतजमीनीचे यथायोग्य डॉक्युमेंटेशन केले. प्रत्यक्ष उभ्या पिकावरुन सारा ठरे. सारा आकारणीची निश्चित पध्दत होती. शेतकरी सारा धान्यरुपात किंवा नगद स्वरुपात भरु शकत असे. दुष्काळात शेतक-याला तगाई मिळे. ती फेडण्यासाठी चार पाच वर्षांची मुदत असे. शिवाजी राजांनी वतनदार पध्दतीचे कंबरडेच मोडले. त्यांनी सारा वसुली करता वेगळे अधिकारी नेमले. या सुधारणांमुळे रयत सुखावली नसेल तर नवल. रयतेच्या गवताच्या काडीची सुध्दा काळजी घेणारा असा राजा जनतेच्या गळ्यातील ताईत होईल, यात काय नवल ! आज आधुनिक व्यवस्थेत देखील लोकशाहीच्या आधारे अशी नवी सरंजामशाही, नवे वतनदार फोफावताना, दृढ होताना आपण पाहतो तेव्हा महाराजांनी साडेतीन शतकांपूर्वी केलेल्या कामाचे महत्व आपल्या लक्षात येते. आज पंचायत राज व्यवस्थेत सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे प्रयत्न हव्या त्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत नाहीत. त्या करता प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. शिवाजी महाराजांनी केलेल्या या मूलभूत आर्थिक सुधारणांचे कौतुक श्रीपाद अमृत डांगे सारखे कम्युनिस्ट विचारवंत देखील करतात, ते याचमुळे.
शिवाजी महाराजांचा स्त्री विषयक दृष्टिकोन –
गरीब कुणब्याच्या पोरीवर अत्याचार केलेल्या रांझ्याच्या पाटलाला शिवाजी राजांनी कोणती शिक्षा दिली, हे आपण सारेच जाणतो. बेळवाडीचा किल्ला जिंकणा-या आपल्या सेनापतीने सकुजी गायकवाडने विजयाच्या उन्मादात त्या किल्ल्याच्या किल्लेदार असणा-या सावित्री देसाईवर बलात्कार केला, तेव्हा आपल्याच सेनापतीची गय न करता महाराज त्याला आजन्म तुरुंगात डांबतात. कठुआतील आठ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करणारे केवळ आपल्या धर्माचे आहेत म्हणून त्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणारे कोणत्या तोंडाने महाराजांचा जयजयकार करु शकतात ? ‘बघतोस काय, मुजरा कर,’ म्हणणा-यांना महाराज कळू शकत नाहीत. महाराज म्हणजे गुर्मी आणि अहंकार नव्हे, हे समजायला हवे.
शिवाजी राजांच्या राज्याची भाषा –आपल्या राज्याची भाषा कोणती असावी, याबाबत शिवाजी राजांनी जो विचार केलेला आहे तो त्यांच्या राज्यकारभारविषयक दृष्टीकोनाचा निदर्शक मानता येईल. राज्यकारभारात फारसी भाषेचे वर्चस्व असणा-या काळात शिवाजी महाराज ‘राज्यव्यवहार कोश’ निर्मिती करतात आणि राज्यातील प्रशासकीय व्यवहार प्राकृतात करण्याची पध्दत सुरु करतात. राजा आणि राज्य लोकांच्या भाषेत बोलले पाहिजे, लोकांच्या भाषेत चालले पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याला लोकांच्या सुख-दुःखाचे भान पाहिजे. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य हे या सर्व निकषांवर खरे उतरते आणि म्हणूनच ते ख-या अर्थाने रयतेचे राज्य होते.
भारताच्या स्वातंत्र्यावर १९६० साली महाराष्ट्राची निर्मिती झाली. भाषावार प्रांत रचनेसाठी अनेक संघर्ष झाले, संयुक्त महाराष्ट्राचा लढा अगदी काल परवाचा वाटावा एवढा अलिकडला आहे. मराठी आपली राजभाषा झाली पण स्वातंत्र्यपूर्व काळात जी खंत माधव ज्युलियन यांनी व्यक्त केली होती –
‘ मराठी असे आमुची मायबोली
जरी आज ती राजभाषा नसे’
ती खंत आता त्यांच्याच शब्दांत थोडा बदल करुन सांगावयाचे तर –
‘मराठी असे आमुची राजभाषा
जरी आज ती मायबोली नसे’
अशी विपरित झाली. राज्यनिर्मितीचा अर्धशतकाहून अधिक वाटचालीनंतरही न्यायालये आणि इतर अनेक शासन व्यवहारात मराठी आणण्यात आपल्याला यश मिळाले नाही. आता तर मराठी शाळांचा टक्का घटतो आहे. शिवाजी राजांच्या चरित्राची भाषा विषयक धोरणासंदर्भातील बाजू आजच्या वर्तमानात आपण कसे पाहणार आणि त्यातून काय शिकणार, हा ही कळीचा मुद्दा आहे.शिवाजी राजांचा संघर्ष म्हणजे हिंदू – मुस्लिम संघर्ष ?
उजवे विचारवंत, इतिहासकार शिवाजी राजांना ‘ गोब्राम्हण प्रतिपालक’ म्हणून संबोधतात. त्यांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणतात आणि त्यांनी एकूणच आयुष्यभर केलेला संघर्ष हिंदू विरुध्द मुस्लिम अशा रंगात रंगविला जातो. तुमचे माझे सर्वांचेच सखोल वाचन हरवलेले असताना आणि वॉटसअप हा आपल्या माहितीचा प्रमुख स्त्रोत असणा-या विलक्षण काळात आपण शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे डोळे उघडून पाहिले पाहिजे आणि जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या या हिंदू मुस्लिम द्विध्रुवात्मकतेचा छेद घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांनी केलेल्या एकूण लढाया आपण पाह्यल्या तर जेवढया लढाया त्यांनी मुस्लिम राजवटींविरुध्द केल्या तेवढाच संघर्ष त्यांना मोरे, मोहिते, सावंत, दळवी, सुर्वे, निंबाळकर अशा आपल्याच लोकांविरुध्द करावा लागला. त्या काळी मोगल आणि चारी शाह्या मुसलमान असल्या तरी त्यांच्या पदरी असणारे अनेक सरदार मराठा होते. औरंगजेबाच्या वतीने मिर्झाराजे जयसिंगांसारखा रजपूतच महाराजांवर चालून आला होता. दुसरीकडे आपण शिवाजीच्या सहका-यांची नावे पाहिली तर त्यांना आग्र्याहून हिकमतीने पळून जाण्यात मदत करणारा मदारी मेहतर कोण होता, मुसलमानच ! शिवाजी राजांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान कोण होता, मुसलमानच ! आरमार दल उभारण्याची दूरदृष्टी दाखवणा-या महाराजांचा आरमार प्रमुख देखील दर्यासारंग दौलतखान हा ही मुसलमानच होता. ही यादी एवढ्यावरच थांबत नाही, ती खूप मोठी आहे आणि ती बोलकी आहे. कॉम्रेड पानसरे यांनी रियासतकार सरदेसाईंचा एक संदर्भ दिला आहे. १६४८ मध्ये शिवाजी राजांच्या सैन्यात सामील होण्याकरता पाचसातशे पठाण आले तेव्हा राजांना गोमाजी नाईक पानसंबळ यांनी एक सल्ला दिला –
‘ तुमचा लौकिक ऐकून हे लोक आले आहेत, त्यांस विन्मुख जाऊ देणे योग्य नाही. हिंदूंचाच संग्रह करु, इतरांची दरकार ठेवणार नाही, अशी कल्पना धरिली तर राज्य प्राप्त होणार नाही. ज्यास राज्य कारणे अठरा जाती चारी वर्ण यांस आपापले धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करुन ठेवावे.’आजच्या परिभाषेत बोलायचे तर राज्य ‘सेक्युलर’ असणे का गरजेचे असते, हेच गोमाजी नाईक पानसंबळ जणू समजावून सांगताहेत. ज्याने त्याने आपापले धर्माप्रमाणे चालावे, त्यात राजाने ढवळाढवळ करु नये, भेदभाव करु नये, ही समज महाराजांच्या सामान्यातल्या सामान्य सहका-यालाही होती . ही समज आजच्या काळात हरवत चाललेली असताना शिवाजी राजे निव्वळ आठवणे नव्हे तर अनुसरणे आवश्यक आहे. शिवकालात मुसलमान राजवटी दुस-या स्वधर्मिय राजवटीविरुध्द लढताना दिसतात, हिंदू राजे हिंदू राजांविरुध्द लढताना दिसतात. याचा अर्थ मध्ययुगीन काळातील या संघर्षाकडे हिंदू मुस्लीम या नेहमीच्या भिंगातून पाहण्याचा मूर्खपणा करु नये. या संदर्भात हिंदूवर जिझिया कर बसविला या बद्द्ल शिवाजी राजांनी औरंगजेबाला लिहलेले पत्र मोठे बोलके आणि महाराज धर्माकडे कोणत्या नजरेने पाहत होते, हे स्पष्ट करणारे आहे. या पत्रात महाराज सुरुवातीला औरंगजेबास अकबराची आठवण करुन देतात. त्यांनी सर्व धर्माच्या आपल्या प्रजेला न्यायबुध्दीने वागविले म्हणून तर जनता त्यांना ‘जगदगुरु’ म्हणे, हे सांगतात. आणि पुढे लिहतात , ‘कुराण हे अस्मानी किताब आहे. या पुस्तकात ईश्वराला ‘ जगाचा ईश्वर’ म्हटले आहे, केवळ ‘ मुसलमानांचा ईश्वर’ म्हटलेले नाही. कारण हिंदू मुसलमान या जाती ईश्वरासमोर एकरंग आहेत. मुसलमान लोक मशिदीत बांग देतात, ती ईश्वराची स्तुती होय आणि हिंदू लोकही मंदिरात घंटा वाजवून ईश्वराची स्तुतीच करतात. म्हणून जातिधर्मावर जुलूम करणे भगवंतांशी वैरत्व करणे होय.’राजाचा धर्म हाच त्याच्या राज्याचा आणि राजकीय संघर्षाचा धर्म नसतो, नव्हे तो नसावा, हे न कळणा-या लोकांनी महाराजांना आणि त्यांच्या संघर्षाला धार्मिक रंगात रंगविण्याचे कारस्थान रचले आहे. हिंदू साधू संतांचा आदर करणारे महाराज याकुत बाबा या मुस्लिम संताचाही आदर सन्मान करत, हे लक्षात घेतले तर भगव्या हिरव्याच्या रंगापलिकडील खुल्या आभाळात विराजमान झालेले शिवाजी महाराज आपल्याला कळू शकतील.
शिवाजी राजांच्या व्यक्तित्वाला काळाच्या मर्यादा नव्हत्या असे नाही. प्रत्येक महापुरुषाच्या व्यक्तित्वाला त्या असतात. राज्याभिषेकासाठी पुरोहितशाहीचे म्हणणे मान्य करणारे महाराज पाहताना काळाच्या अपरिहार्य चौकटीची आपल्याला कल्पना येते. पण त्याच वेळी मुसलमान झालेल्या नेताजी पालकर आणि बजाजी निंबाळकरांना महाराज हिंदू धर्मात परत घेतात. केवळ परत घेतात असे नाही तर निंबाळकरांशी स्वतःच्या मुलीचा विवाह लावतात. याचा अर्थ आपण नीट समाजावून घेतला पाहिजे. शिवाजी राजे धार्मिक जरुर होते पण ते धर्मांध नव्हते. औरंगजेब अथवा इतर कोणत्याही मुसलमान राजवटीविरुध्दचे त्यांचे युध्द हे धर्मयुध्द नव्हते. जी गोष्ट धर्माची तीच जातीची . शिवाजी राजे खरं म्हणजे केवळ मराठ्यांचे देखील नव्हते. अठरापगड माणसं त्यांच्या सोबत होती. ब्राम्हणांपासून न्हावी, रामोशी, महार, मांग अशी सगळ्या जातीची माणसं महाराजांसोबत होती, त्यांच्या जीवाभावाची होती. त्यांच्या हेरखात्याचा प्रमुख असणारा बहिर्जी नाईक हा रामोशी होता. शिवाजी राजांनी अस्पृश्य मानल्या जाणा-या अनेकांना किल्लेदार आणि त्यांच्या मगदूराप्रमाणे विविध पदावर नेमले होते. शिवाजी राजांच्या धार्मिक आस्थेला खुलेपणाची, मोकळ्या अवकाशाची आस होती. म्हणूनच सामूहिक सर्जकतेचे मूर्तिमंत स्वरुप असणारे राज्य महाराष्ट्रात साडेतीनशे वर्षांपूर्वी अवतरु शकले. हे स्वराज्य कोण्या एका धर्माची, जातीची मिरासदारी नव्हती. महाराष्ट्रातील प्रबोधन काळात महात्मा फुले शिवाजीची समाधी शोधतात, त्याच्यावर ‘कुळवाडी भूषण’ असा गौरव करत पवाडा रचतात. याच फुल्यांना गुरुस्थानी मानत आंबेडकर आपली सामाजिक चळवळ संविधानापर्यंत नेतात. हा सारा मूल्यात्मक प्रवास आपण समजून घेतला पाहिजे. आज शिवाजीचे नाव घेऊन जातीजातीमध्ये भांडणे लावण्याचे मनोहर, मनाला भिडणारे आणि भेडवणारे प्रकार पाह्यला मिळत असताना शिवाजीचे भीमनगर मोहल्ल्याशी असणारे जैव नाते आपल्याला समजायला हवे. आज शिवाजीच्या नावावर अनेकांनी राजकीय वतनदारी सुरु केली आहे. राजकीय स्वार्थाचा रंग फासत आपल्याला हवा तसा शिवाजी रंगवणा-या या सगळ्यांपासून चार हात दूर राहण्यात शहाणपण आहे. आपल्या डोळ्यांदेखत होणारे आपल्या लाडक्या राजाचे अपहरण आपण समंजसपणे रोखले पाहिजे. शिवाजीचे नाव वापरुन आपल्याला वेगवेगळया अस्मितांमध्ये झुंजवण्याचा खेळ राजकीय शक्ती खेळत आहेत. आणि आपण वेड्यासारखे महाराजांचे स्मारक, तिथल्या पुतळ्याची कमी जास्त होणारी उंची या वादात अडकलो आहोत. शिवाजीला समजावून घेण्याकरता पुतळ्याची नव्हे आपल्याला आपली बौध्दिक उंची वाढविण्याची गरज आहे. खोटया अस्मितांना गोंजारणे आता बंद करु या.कॉ गोविंद पानसरे यांचे ‘ शिवाजी कोण होता ?’ हे पुस्तक वाचताना रयतेवर प्रेम करणारा, राजधर्म पाळणारा राजा, परंपरागत अन्याय्य राजकीय व्यवस्था मोडून काढणारा बंडखोर, स्त्रीचा कमालीचा आदर करणारा एक सुसंस्कृत माणूस, राजभाषेविषयी विचार करणारा राजकीय धुरिण अशा अनेक रुपात शिवाजी राजे आपल्यासमोर येतात.
शिवरायांची ही इतिहासाशी सुसंगत आणि वस्तुनिष्ठ प्रतिमा आजच्या लोकशाही राजकीय व्यवस्थेला अधिक बळ देणारी आहे. सर्वसामान्य जनतेला नवा आत्मविश्वास देणारी आहे, हिंदू मुस्लिम भेदभावापलिकडे जाऊन, जातिभेदापलिकडे जाऊन माणसांसाठी नवे राज्य उभं करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. कुणी काही म्हटले तरी आपला शिवाजी हा आहे, हे आपण विसरता कामा नये. म्हणून तर आज साडे तीनशे वर्षांनंतरही रोज या रयतेच्या राजाची आठवण येते आणि सह्याद्रीचे खुले वारे गाऊ लागते –
‘ माझ्या घरची विशाल दारे, खुशाल ही राहोत खुली
मज गरीबाची कांबळ – वाकळ सकळांसाठी अंथरली.’
कुठला शिवाजी आमचा ?
शिवाजी दोन छावणीत विभागला आहे. एका छावणीला तो हिंदूपदपातशहा व मुस्लिमांचा कर्दनकाळ म्हणून मिरवायचा आहे. तर दुसऱ्या छावणीसाठी तो केवळ कुळवाडी भूषणच नाही तर स्त्री-शूद्रातिशूद्रांच्या स्वराज्याचा राजा आहे. रयतेचा राजा आहे.
ज्यांच्या पूर्वजांनी, हयातीतच शिवाजीला साथ देण्याऐवजी त्याची वारंवार कोंडी केली त्या शिलेदारांचे वारसदार पहिल्या छावणीत आहेत. ही स्वराज्यद्रोह्यांची छावणी !
दुसरी छावणी ज्यांचे पूर्वज शिवाजीसाठी प्राणार्पणास सिद्ध झाले त्या बारगीरांची आहे. हे मुख्यतः काटक कष्टकरी आहेत, ज्यांना मावळे म्हटले जाते.
पहिल्या छावणीला शाहिस्तेखानाची तुटलेली बोटे, अफजलखानाचा कोथळा हा खूनखराबाच शिवाजीची ओळख बनवायचा आहे. पण याहून जास्त खूनखराबा केलेले पराक्रमी राजे इतिहासाच्या पानापानांवर तलवार परजताना दिसताहेत.
मग रयतेच्या मनात त्या महापराक्रमींना का स्थान मिळाले नाही ? याचे उत्तर इतिहासकार शेजवलकर अनाहूतपणे देऊन जातात.
शेजवलकरांनी शिवबाच्या उण्यापुऱ्या पन्नास वर्षांच्या आयुष्याची आठ भागात विभागणी केली व दाखवून दिले आहे की, त्यातील सात भाग हे शिवाजीच्या मुलकी कारभारातील व्यस्ततेचे आहेत व फक्त एक भाग लष्करी कारवायांचा आहे!
सतत कमरलेला तलवार लटकवलेला शिवाजी आम्हांला या स्वराज्यद्रोहींनी दाखवला आहे. रयतेच्या मनात स्थान मिळविलेला मुलकी कारभारातून आपले प्रजावत्सल मन सतत प्रगट करणारा शिवाजी त्यांनी दडवला.
शेती हा तत्कालीन अर्थव्यवस्थेचा कणा होता. महसूलाचा प्रमुख स्त्रोत तोच होता. हा शेतकरी निसर्गाच्या अवकृपेचा वारंवार बळी ठरतो, म्हणून त्याच्याकडून शेतसारा घेताना तो शेतीच्या उत्पादनाचे नियतकालिक अवलोकन करुन त्याप्रमाणे घ्यावा. जर पीकच पोटापुरते आले आहे तर शेतसारा माफ करावा. जिथे वरकड झाले आहे तेथे त्याप्रमाणातच पट्टी घ्यावी. बी बियाण्यास मोताद असणाऱ्यांना ते सरकारातून द्यावे आणि पीक आल्यावर ते उजवून घ्यावे. रोखीत मोबदला मागू नये. शेतकऱ्याला तोशीस पडेल असा व्यवहार अधिकाऱ्यांनी कदापि करु नये, अशी सक्त ताकीद देणारा राजा रयतेने त्याआधी अनुभवला नव्हता.
शेतजमिनची एकूण 17 प्रकारची प्रतवारी करून त्याप्रमाणे शेतकऱ्याची कुवत ठरविली जाई. केवळ किती क्षेत्र आहे यावर त्याची शेतसारा देण्याची कुवत निर्धारित केली जात नसे.
" रयतेच्या भाजीच्या देठासही तू निमित्त होता कामा नये. आंबा, साग आदी वृक्ष आरामाराचे बहुत उपयोगीचे. पण ही झाडे रयतेने आपल्या लेकरांसारखी वाढविली आहेत. ती तोडली असता त्यांच्या दु:खास पारावार काय ? हे वृक्ष धन्यास राजी करून रोकड मोजून घ्यावेत, बलात्कार सर्वथा न करावा ..." ही आज्ञापत्रातील काही वाक्ये आपल्याला शिवबा पिढ्यानपिढ्यांचे दैवत का बनला याचा प्रत्यय देतात.
शेतकऱ्याच्या बांधावर रमणारा, तलवारीवर नव्हे तर नांगरावर प्रेम करणारा आमचा शिवाजी आहे !
अफझलखानच्या बाजूने आपली पथके घेऊन उतरलेल्या शिळिमकर, बांदल, पिलाजी मोहिते, बाबाजी भोसले यांच्या वारसदारांनी आम्हाला शिवाजी शिकवू नये.
त्याचप्रमाणे मिर्झा राजे जयसिंगाला विजय मिळावा म्हणून यज्ञांआडून दक्षिणेची लाच लाटत स्वराज्याची सारी गुपिते मिर्झाला सांगून ज्यांनी शिवबावर नामुष्कीचा पुरंदर तह व आग्रा कैद लादली व दग्याने ज्यांनी संभाजी राजांना मोगलांकडे सुपूर्द केले त्या स्वराज्यद्रोही पळीपंचपात्रवाल्यांनी देखील आम्हाला शिवबा शिकवू नये !
ज्या आमच्या कष्टकरी मुस्लिम बांधवांच्या विरोधात सदोदित तुम्ही शिवाजी दाखवत आलात ते मुस्लिम शिवाजीशी जेवढे एकनिष्ठ राहिले तेवढे तुमचे पूर्वज राहिले नव्हते !
इतिहासाचे एक पान असे काढून दाखवा, जिथे शिवरायांच्या सोबत असणाऱ्या एका तरी मुसलमानाने त्यांना दगा दिलेला आहे.
एक पान असे काढून दाखवा, जिथे कुणी मांग, महार, बेरड, भिल्ल, रामोशी, भंडारी, कोळी, आग्री व सामान्य मराठा, कुणबी, माळी, धनगर, वंजारी आणि कारागीर जातीतून आलेल्यांनी शिवाजीशी दगलबाजी केली आहे.
आमचा शिवाजी हा हिंदूपदपातशहा नाही. गोब्राम्हण प्रतिपालक तर मुळीच नाही. तो रयतेसाठी, रयतेला घेऊन रयतेचे राज्य आणणारा, फक्त 'शिवबा' आहे !
- किशोर मांदळे, पुणे.
सेनानी साने गुरुजी
महाराष्ट्राचे आधुनिक संत म्हणून ओळखले जाणारे साने गुरुजी यांचा 11 जूनला स्मृतीदिन आहे. साने गुरुजी यांनी लिहीलेल्या "शामची आई" या पुस्तकाने महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांना प्रभावित केले आहे. संस्कारगाथा अस या पुस्तकाच वर्णन करता येईल. कोवळ्या वयातील मुली-मुलांच्या मनात पालकांच्याबद्दल आदरभाव बाळगण्याचे, जातीआधारित अहंकार सोडून देण्याचे, श्रमाची प्रतिष्ठा राखण्याचे, निसर्गाविषयी कृतज्ञभाव जपण्याचे आवश्यक संस्कार या पुस्तकाने रुजवले आहे. एकुणातच समंजस आणि उदारमतवादी नागरिकत्व घडण्यास हे पुस्तक उपयोगी ठरलेले आहे. या पुस्तकाच्या लाखो प्रती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आहेत. या पुस्तकामुळेच साने गुरुजींची मातृह्रदयी साने गुरुजी ही प्रतिमा ठसठशीत बनली.
आंतरभारतीचे स्वप्न उपस्थितांना समजावून सांगताना साने गुरुजी एकदा म्हणाले होते, माणसाच्या पायात काटा टोचल्यानंतर त्याची वेदना मेंदुमधे जाणवते, डोळ्यातील अश्रुवाटे ती वेदना व्यक्त होते आणि पायातील काटा काढण्यासाठी हात पुढे सरसावतात. पाय, हात, डोळे, मेंदू हे अवयव वेगवेगळे असले तरी वेदनेच्या प्रसंगात ते सर्वजण एकत्र येऊन वेदना सुसह्य करण्यासाठी, वेदना दूर करण्यासाठी एकोप्याने कृती करतात. त्याचप्रमाणे आपण सर्व भारतीय वेगवेगळी भाषा बोलणारे असूत किंवा वेगवेगळी श्रद्धा बाळगणारे असूत आपण एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे. एकमेकाच्या अडीअडचणीला उभे राहिले पाहिजे. साने गुरुजींच्या अशा भावनाशील बोलण्याने, लिखाणाने आणि कृतीने साने गुरुजींची मातृह्रदयी साने गुरुजी ही प्रतिमा आणखी ठसठशीत बनली. साने गुरुजींच्या मृत्युनंतर आपण त्यांची हीच मातृह्रदयी प्रतिमा सतत प्रसारित केली. असं म्हणतात की कोणत्याही महान व्यक्तीमत्वाचे अनुयायी त्या महान व्यक्तीच्या जीवन कार्यातील आपल्याला झेपेल आणि रुचेल तेवढाच भाग स्विकारतात आणि तेवढाच भाग सतत सांगत रहातात. साने गुरुजींच्याबद्दलही काहीस असंच झालं आहे का? सामाजिक सलोखा आणि परस्पर आदरभाव रुजवण्यासाठी साने गुरुजींनी केलेले कार्य महान आहेच पण साने गुरुजींचं जिवितकार्य एवढ्यापुरतच मर्यादित नाही. अन्यायाविरुद्ध बोलायला, भूमिका घ्यायला आणि कृती करायला शिकवणं हा सुद्धा एक आवश्यक संस्कार असतो. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची लढवय्या वृत्ती साने गुरुजींच्यामधे होती की नव्हती? असेल तर ती पुढे का येत नाही? आधी म्हटल्याप्रमाणे आपण आपल्याला पचतील, रुचतील तेवढेच साने गुरुजी स्विकारल्यामुळे असं झालं असेल का?
चले जाव आंदोलनातील साने गुरुजी
ब्रिटीशांच्या साम्राज्यवादी जोखडातून भारताला मुक्त करण्यासाठी एकोणीसशे बेचाळीस साली म. गांधीजींच्या नेतृत्वाखाली निर्णायक आंदोलन छेडले गेले. या आंदोलनाच्या ठरावात ब्रिटीशांना "छोडो भारत" असे बजावण्यात आले होते तर हे घडवून आणण्यासाठी भारतीयांसाठी "करा अथवा मरा" चा आदेश होता. साने गुरुजींनी बेचाळीसच्या चले जाव आंदोलनात उडी घेतली. भूमिगत राहून ब्रिटीशांच्या विरोधात रान उठवण्याचे काम ते आणि त्यांचे सहकारी करत होते. आपल्या ओजस्वी वाणीने ब्रिटीश राजवटीविरोधात युवती-युवकांच्या मनात अंगार फुलविण्याचे काम साने गुरुजी करत होते. त्यांच्या प्रेरणेने अनेक युवती- युवकांनी चले जाव आंदोलनात स्वतःला झोकून दिले. या आंदोलनादरम्यान साने गुरुजींनी "क्रांतीच्या वाटेवर" ही पुस्तिका लिहीली. बरेच दिवस ही पुस्तिका अप्रकाशित होती. काही वर्षांपुर्वी साधना प्रकाशनाने विशेषांक स्वरुपात ही पुस्तिका प्रकाशित केली. हिंसा-अहिंसा याबद्दलचे आपल्या मनातील विचार साने गुरुजींनी या पुस्तिकेत शब्दबध्द केले आहेत. ब्रिटीश राजवटीविरोधात संघर्ष करण्याचे आवाहन तरुणी-तरुणांना करताना या पुस्तिकेत साने गुरुजींनी जे लिहीलय त्याचा थोडक्यात आशय असा आहे. काँग्रेस वर्कींग कमीटीच्या ८ ऑगस्ट १९४२ च्या ठरावाद्वारे भारतीयांनी आपले स्वातंत्र्य घोषित केले आहे. प्रत्येक भारतीयाने उद्यापासून स्वतःला स्वतंत्र नागरिक मानावे व तसा व्यवहार करावा असे मार्गदर्शन म. गांधीजींनी केले आहे. या ठरावानुसार आज भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहे आणि त्यामुळे भारतीय भुमीवरील ब्रिटीश राजवट ही परकीय राजवट ठरते. परकीय राजवटीला भारतीय भूमीवरुन घालवून देण्यासाठी आपण जे करत आहोत ते एक प्रकारचे युद्धच ठरते. मानवी जीवन अनमोल आहे. या लढ्यात होता होईल तो जिवीतहानी टाळण्याचाच आपला प्रयत्न असायला हवा आणि तो राहीलच पण परकीय सत्तेविरुद्धच्या युद्धात हिंसा-अहिंसेची चर्चा अप्रस्तुत ठरते. साने गुरुजींच्या या भुमिकेबद्दल चर्चा होऊ शकते. पण बेचाळीसच्या चले जाव आंदोलनातील सहभागातून साने गुरुजींच्यामधील जो लढाऊ देशभक्त आपल्यासमोर येतो तो आपण समजून घेत आहोत का? इतरांना समजावून सांगतो का, हा खरा प्रश्न आहे. पुढे चले जाव आंदोलनात साने गुरुजींना अटक झाली. धुळे आणि नाशिक येथील कारागृहात त्यांना ठेवले होते. आंदोलनात सहभागी असलेल्या आपल्या सहकाऱ्यांची नावे सांगावीत म्हणून ब्रिटीश पोलीसांनी त्यांना अमानुष मारहाण केली. हा मार सहन करण्याची प्रेरणा शामच्या आईच्या आठवणीतूनच साने गुरुजींना मिळाली असणार. त्यांनी मारहाण सहन केली मात्र आपल्या एकाही सहकाऱ्याचे नाव त्यांनी स्वतःच्या तोंडातून बाहेर पडू दिले नाही. मातृह्रदयी साने गुरुजींचा अशा प्रसंगातला निर्धारही तितकाच कणखर होता.
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण
साने गुरुजींच्यामधील संघटन कौशल्य खऱ्या अर्थाने नजरेत भरले ते काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनाच्या वेळी. ग्रामीण भागात होत असलेल्या काँग्रेसच्या या अधिवेशनाच्या व्यवस्थेसाठी साने गुरुजींच्या मार्गदर्शनात स्वयंसेवक दल उभारले होते. यातूनच राष्ट्र सेवा दलाची संकल्पना पुढे आली. ग्रामीण भागात होत असलेल्या या अधिवेशनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण भारताचे विविध प्रश्न काँग्रेसच्या अजेंड्यावर आणण्यासाठी साने गुरुजींनी प्रयत्न केले. शेतकरी व कामकरी समुहांनी अधिवेशनाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे याकरिता गुरुजींनी खानदेश आणि लगतचा नाशिकपर्यंतचा भाग पिंजून काढला.
आता उठवू सारे रान,
आता पेटवू सारे रान,
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी,
कामकऱ्यांच्या राज्यासाठी,
लावू पणाला प्राण!
हे गाणं गुरुजींनी याच काळात आणि याच कारणासाठी लिहीलेलं आहे. भारतातला शेतकरी आज अडचणीत आहे. शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. शेतीउद्योग प्रचंड जोखमीचा बनलाय. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांना विरोध करत हजारो शेतकरी ऊन, पाऊस, थंडीत दिल्लीच्या सिमेवर तळ ठोकून आवाज उठवत आहेत. सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असुनही भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत नाही. सरकारची ही असंवेदनशीला निष्क्रीयता निषेधार्ह आहे. अशावेळी साने गुरुजींच्या या गाण्याने साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुली-मुलांनी प्रेरणा घ्यायला हवी. शासनाची शेती आणि शेतकरीविरोधी धोरणे बदलवण्यासाठी गुरुजींचे हे गाणे पुन्हा एकदा या देशातील तरुणी आणि तरुणांच्या ओठावर यायला हवे.
प्रताप मिलच्या कामगारांचा लढा
अंमळनेर येथील प्रताप मिलच्या कामगारांचा संप साने गुरुजींच्या नेतृत्वाखाली झाला होता. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म. गांधीजींचे शिष्य असणारे साने गुरुजी गांधीजींच्याच भाषेत म्हणाले, कारखानदारांनी, विश्वस्तवृत्तीने वागले पाहिजे. उत्पादनात कामगारांच्या घामाचाही हिस्सा असतोच. कामगाराला आणि कामगारांच्या घरच्यांना सुखाने जगता येईल एवढा त्यांच्या श्रमाचा मोबदला त्यांना मिळालाच पाहिजे. संपकरी कामगारांसमोर बोलताना साने गुरुजींनी कामगारांच्या घामाची चोरी आणि कारखाना मालकाची लोभी वृत्ती याबाबत टिकास्त्र सोडले होते. हा संप यशस्वी झाला आणि प्रताप मिलच्या कामगारांना न्याय मिळाला. आज कामगार कायदे कमकुवत केले जात आहेत. कॉंट्रॅक्ट लेबर नावाच्या राक्षसानं कामगारांच्या न्याय्य अधिकारांना सुरुंग लावलाय. इथेही भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने कामगार कायद्यात घातक बदल करुन कामगारांनी लढून मिळवलेले अधिकार हिरावून घेण्याचं काम चालवलय. कोरोनाच्या निमित्ताने आलेल्या लॉकडाऊनमुळे कष्टकरी मजुरांचे अतोनात हाल झाले. व्यवस्था म्हणून आपल्याला सर्वांनाच आपली लाज वाटावी इतकी मजूरशक्तीची झालेली परवड जगाने पाहिली. तळात दडपलेलं विषमतेचं भयाण वास्तव कोरोनाच्या निमीत्ताने पृष्ठभागावर आलं. अशावेळी कामगारांच्या घामाची चोरी होऊ न देण्यासाठी, त्यांना सन्मानाने व समाधानाने जगता यावं यासाठी संविधानाच्या, कायद्याच्या कक्षेत राहून आपापल्या परीने काहीना काही कृती करण्याचं बळ साने गुरुजींच्या स्मृतीतून आपल्याला मिळायला हवं.
पंढरपूर मंदीर प्रवेश सत्याग्रह
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्व जाती-धर्माच्या स्त्री-पुरुषांना प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजींनी केलेले प्राणांतिक उपोषण हा त्यांच्या जिवीतकार्यातील महत्वाचा टप्पा आहे. जन्माधिष्ठीत उच्च-निचतेवर आधारलेल्या चातुर्वण्य व्यवस्थेतील अन्याय व शोषण हा कुठल्याही संवेदनशील व समताप्रेमी माणसाला अस्वस्थ करणारा विषय. साने गुरुजींसारख्या भावूक आणि प्रेमाच्या शक्तीवर विश्वास असणाऱ्या व्यक्तीने अशा मुद्द्यासाठी आपले प्राण पणाला लावायचा निर्धार करावा हे सुसंगतच मानले पाहिजे. एकेकाळी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा हा वाद जोरात होता. म. गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्यात या दोन्ही आघाड्यावरील कार्यक्रम व उपक्रमांची अशी काही सांगड घातली की तो वादच अप्रस्तुत ठरला. साने गुरुजी आणि त्यांचे समाजवादी सहकारी गांधीजींच्याच मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यलढ्यात कार्यरत होते. बेचाळीसच्या लढ्याची धामधुम कमी होताच आणि भारताचे राजकीय स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येताच गुरुजींनी सामाजिक समतेच्या लढ्याकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी हा महत्वाचा सत्याग्रह हातात घेतला. यासाठी राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकासह महाराष्ट्राच्या गावोगावी जावून त्यांनी महाराष्ट्राच्या समाजमनाला साद घातली. कलापथकाच्या प्रबोधनामुळे अनेकांची पारंपारिक भूमिका बदलली. काही थोडे जण मात्र अधिक कर्मठ बनले. साने गुरुजींनी पंढरपुरच्या वाळवंटात प्राणांतिक उपोषण सुरु केले.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म,
भेदाभेद भ्रम अमंगळ!
या संत तुकारामांच्या भुमिकेची आठवण सर्वांना आणि विशेषतः विरोध करणाऱ्या बडव्यांना या सत्याग्रहाने करुन दिली. पंढरीचा विठ्ठल हे बहुजनांचे दैवत. समतेचा पुकारा करणाऱ्या बौद्ध परंपरेशी नाते सांगणारा हा देव. पूरोहितशाहीच्या पोटापाण्याचा आधार म्हणून रुजवलेल्या कुठल्याही निरर्थक कर्मकांडाला वारकरी परंपरेत थारा नाही. भक्तांच्याकडून केवळ नामस्मरणाची अपेक्षा सांगणाऱ्या परंपरेतील हा देव आहे. आपलं काम प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या भक्ताला आपल्या कामातच पांडुरंग भेटेल असं आश्वस्त करणाऱ्या परंपरेतील हा देव. अशा विठ्ठलाच्या गाभाऱ्यात केवळ जातीच्या आधारावर काही जणांना प्रवेश नाकारणे हे म्हणजे वारकरी परंपरेच्या विरोधातील भूमिका. साने गुरुजींची भूमिका महाराष्ट्राच्या समाजमनाने उचलून धरली. विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व भावा-बहिणींसाठी खुले झाले. देशाचे स्वातंत्र्य वेशीवर आलेले असताना साने गुरुजींचे हे उपोषण नव्या भारतासाठी दिशा दिग्दर्शक होते. येऊ घातलेल्या भारतीय संविधानातील सामाजिक समतेच्या मुल्याचं जमीनीवरील ते प्रात्यक्षिक होतं. आज साने गुरुजींची आठवण काढताना मनात अनेक प्रश्न आहेत. एकविसाव्या शतकात मंदिरप्रवेशाचा मुद्दा अप्रस्तुत ठरलाय. पण अन्यायकारी व विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या जातीव्यवस्थेचा मुद्दा तर कायम आहे. सरकारे बदलली तरी जातीय अत्याचार सुरुच आहेत. जातीअंताची लढाई आज वेगळ्या टप्प्यावर नेण्याची गरज आहे. जातीय अत्याचार व महिला अत्याचाराच्या घटनातील गुन्हेगारांना वेळेत कठोर शासन करुन कायद्याच्या राज्याचा वचक निर्माण करण्याची गरज वाढलीय. समाजात सामाजिक सलोखा हवाय तो अशा अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी, त्यावर पांघरूण घालण्यासाठी नाही. सर्वांना चांगल्या शिक्षणाचा व सक्षम रोजगाराचा अधिकार मिळावा, उपजिवीकेच्या साधनांच्यापर्यंत सर्वांची पोहोच वाढावी या आघाड्यावर सामाजिक समतेची लढाई ताकदीने लढण्याची गरज आजही तितकीच तीव्र आहे.
साने गुरुजी मातृह्रदयी होते. भावनाशील होते. आणि त्याचबरोबर लढवय्ये सुद्धा होते. खरे तर ज्याच्या मनातील संवेदनशीलता जागी आहे आणि ज्याच्या काळजातील भावना अद्याप थिजलेल्या नसतात अशी माणसेच नवनिर्माणकारी संघर्षात स्वतःला झोकून देवू शकतात. आज ११ जूनला साने गुरुजींच्या स्मृतीदिनी
खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे
असं सांगत वैश्विक प्रेमाचा संदेश देणाऱ्या साने गुरुजींची आठवण तर काढुयाच आणि त्याचबरोबर शेतकरी, कामगार आणि शोषित जातीसमुहांच्या न्याय्य अधिकारांसाठी ठोस कृती करणाऱ्या, निर्धाराने संघर्ष करणाऱ्या लढवय्या साने गुरुजींनाही अभिवादन करुया..!!!
Subhash Ware सरांच्या वॉलवरून..
साने गुरुजींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..!!!
Subscribe to:
Posts (Atom)
