Sunday, September 2, 2012

माणसं भेटतात...प्रसंग आठवतात....



माणसं भेटतात...प्रसंग आठवतात....

मनात भावनांची गर्दी झाली कि शब्द अबोल होतात,

बुद्धी परकी होते....फक्त आपल्यासाठी का होईना काळाचं चक्र थांबतं...




खूप काही बोलायचं असतं, पण नेमक्या शब्दात मांडणं कठीण होऊन जातं.


काय सांगावं,कसं सांगावं, काय आधी सांगावं, सांगितलंच पाहिजे का...?

हे विचार करता करता सगळंच सांगायचं राहतं.




युद्धभूमीवर सामान्य सैन्य पुढे करून राजाने मागून सगळं रणांगण पहावं तसं

शब्दांच्या गिचमिडीत नेमके हवे तेच शब्द मागे राहतात...

मग जाणवतं कि,

जे शब्द ओठातून निसटतात...ते अगदी शुल्लक असतात.....

जे लपून राहतात....ते खरे योद्धे असतात...त्यांनी लढायला हवं होतं...




घुमटामध्ये आवाज घुमतो...प्रतिध्वनी ऐकू येतो....पण....

घुमट समजून खुल्या आभाळाखाली जोरात किंकाळी मारून प्रतिध्वनीची वाट पाहण्यात काही अर्थ नसतो,

आपलाच आवाज आपल्याला परत ऐकू येत नाही.....

येईलच कसा....?

परत यायला आवाजही आभाळाच्या संपण्याची वाट पाहत धावत असतो....पण आभाळ संपतच नाही....

आभाळ हि अनंताकडे स्वतःचा अंत मागत असतं......

आवाज काही परत येत नाही....आणि....वाट पाहणाऱ्याची वाट पाहणं हि संपत नाही.....

मग एकटेपणाशी भेट होते.....




"वर्तमानात आवडत्या माणसाला वेळ नाही दिला कि,भविष्यातला बराचसा वेळ एकटेपणाला द्यावा लागतो...सो आज जी माणसे भेटल़ी त्यांना सर्वाना धन्यवाद.......

No comments:

Post a Comment