जकात एक उपासना असून इस्लाम धर्माचा महत्वाचा स्तंभ आहे. प्रेषितांचे सहकारी अब्दुल्लाह बिन उमर [रजी] म्हणतात, अल्लाहचे प्रेषित मुहम्मद [स.] म्हणाले, इस्लामचे पाच स्तंभ आहेत - १] अल्लाहच्या एकत्वाची आणि मुहम्मदांच्या प्रेषितत्वाची साक्ष देणे, २] नमाज अदा करणे, ३] जकात अदा करणे, ४] रमजानच्या रोजांचे पालन करणे आणि ५] अल्लाहच्या उपासनागृहाचा हज करणे. [बुखारी, किताबुल इमान, कथन ८]
इस्लाममध्ये अल्लाहच्या उपासनेच्या काही पद्धती निर्धारित करण्यात आल्या आहेत. नमाज, रोजा, जकात, हज, कुर्बानी आणि उमरा या अल्लाहच्या उपासना पद्धती आहेत. यापैकी एकही उपासना जाणीवपूर्वक नाकारणारी व्यक्ती मुस्लिम असू शकत नाहीत. प्रत्येक मुस्लिम व्यक्तीवर अल्लाहची उपासना करणे अनिवार्य आहे. नमाज आणि रोजा शारीरिक आणि मानसिक उपासना आहेत तर जकात एक आर्थिक उपासना आहे. हज, उमरा आणि कुर्बानी समर्पणभाव व्यक्त करणाऱ्या प्रतिकात्मक उपासना आहेत.
या उपासना अल्लाहच्या आदेशानुसार आपल्या मूळ स्वरूपात अदा केल्या जातील. उपासनांपैकी एकाचेही स्वरूप बदलण्याचा अधिकार अल्लाहशिवाय अन्य कोणालाच नाही. जकात ही आर्थिक उपासना अल्लाहच्या आदेशाने त्याच प्रकारे केली जाईल, ज्याप्रकारे अदा करण्याचा आदेश अल्लाहने दिला आहे.
No comments:
Post a Comment