Monday, November 22, 2021

बुलंद अख़लाक : उदात्त चारित्र्य



एक निस्सिम स्त्री भक्त (आबिदा) आपले भक्तीचे सामान अर्थात हातात जपमाळ (तसबी) आणि काखेत नमाजची चटई (मुसल्ला) घेवून परमेश्वराचा धावा करत काबागृहापर्यंत पोहोचली. परमेश्वराला म्हणाली, ''तुझी कृपा झाली तर एखादा भिकारीही शहेनशहा होवू शकतो आणि एखाद्या अनाथालाही प्रेषित बनवू शकतोस. मलाही कांही कृपाप्रसाद दे''. अल्लाह म्हणाला, "अगं वेडे, माझ्याकडे एकत्व, एकता आणि ऐक्य (वहदत) याशिवाय कांहीच नाही. तुला कांही जीवनाचे शहाणपण, भौतिक, सांसारिक आस, जगण्याची कला, युक्ती (शिकवण) हवी असेल तर मुहम्मद (स.) पैगंबरांकडे मदिना शहरी जा. आणि त्यांचेकडूनच जे काय हवे असेल ते घे. ते तुला संदेश व मार्ग दाखवतील." ही गोष्ट सांगण्याचे प्रायोजन म्हणजे इस्लाममधील परमेश्वराची संकल्पना व भूमिका काय आहे आणि त्याचबरोबर जीवनातील पैगंबरांचे मोठेपण काय आहे हे  आपण समजू शकतो. एकमेवाद्वितीय परमेश्वराने या अफाट विश्वाला एका विशिष्ट गती आणि नियमामध्ये बद्ध केले आहे. कांही शाश्वत आणि नैसर्गिक गोष्टींचे वचन दिलेले आहे. हे सगळे माणसाला मुक्तपणे बहाल केले आहे. त्याला स्वातंत्र्य व स्वायतत्ता दिली आहे. परमेश्वर सर्वांचे जीवन नियंत्रित करीत नाही. याउपर माणसाने या विश्वात कसे जगावे हे त्याचेवरच अवलंबून आहे. जीवन अनमोल आहे. त्याने आपले जीवन निश्चत हेतू, उद्देश व ध्येयाने जगावे. या वैश्विक व नैसर्गिक जीवनाशी तादात्म्य पावत जीवन जगण्याचे मार्गदर्शन व पैगाम देणारे मुहम्मद (स.) पैगंबर हे होत. त्यांचे उदात्त जीवन हेच आपल्या समोर आदर्श जीवनशैलीचे उदाहरण आहे. म्हणूनच कुराण मध्ये याचा विशेष उल्लेख आहे. "बेशक आपके आख़लाक बुलंद हैं।" ( कु. ६८:४ ).


आपण जाणतोच की पैगंबरांच्या आगमनापूर्वीचा काळ अज्ञान, अंधकार, स्वार्थ, हिंसा, चमत्कार, बुवाबाजी, भ्रष्टाचार, भेदभाव आदींनी ग्रासलेला व दुभंगलेला समाज होता. मद्य, ललना, दुर्गण आणि लढाई यामध्ये आकंठ बुडालेला होता.  समाज अज्ञानमुलक व नैतिकदृष्ट्या अगदी अध:पतीत होता. पैगंबरांनी यासर्व गोष्टींमध्ये क्रांतीकारक बदल घडवून समग्र समाज परिवर्तन घडवून आणले. पैगंबरांनी जीवनाचे मर्म जाणले. माणसाला जगण्यासाठी सन्मान, शांती व सुरक्षितता हवी. प्रत्येक व्यक्ती एक माणूस म्हणून उच्च व श्रेष्ठ दर्जापर्यंत पोहोचला पाहिजे तरच सर्वार्थाने एक उन्नत समाज उदयाला येईल. पैगंबरांचना समाजामध्ये जे कांही बदल घडवायचे होते ते स्वतःच बदल बनले. स्वतःचे जीवन उच्च नैतिकता व उदात्त चारित्र्याने ( बुलंद अख़लाक ) जगले. एक स्वत:चा आदर्श समाजासमोर ठेवला.


आजची सामाजिक परिस्थितीही अतिशय विदारक व ढासळलेली आपण पहातो. माणसाचा स्वार्थ पराकोटीला पोहोचला आहे. स्वतःच्या  फायद्यासाठी दुसऱ्याला, समाजाला आणि निसर्गाला ओरबाडणे सुरु आहे. भांडवली, कार्पोरेट आर्थिक व्यवस्था सैतानी स्वरूपात पुढे येते आहे. जात, धर्म, वंश, राष्ट्र, लिंग अशा अनेक गोष्टींतून भेदाभेद निर्माण केला जात आहे. राजकारण म्हणजे तर 'जिसकी लाठी उसकी भैंस' असेच म्हणावे लागेल. उच्च, नीच, गरीब, श्रीमंत अशी विषमता तर वाढतच आहे. लोकशाही, स्वातंत्र्याचा संकोच सुरु आहे. धार्मिक कट्टरवाद, दांडगाई आणि दडपशाहीने अस्थैर्य व अराजक निर्माण झाले आहे. भ्रष्टाचार, हिंसा, बलात्कार, हत्या, बुवाबाजी, चमत्कार, जुगार, सट्टेबाजी, पैशाचा पाऊस, व्यसनाधिनता अशा वाईट गोष्टींनी समाज पोखरला आहे. एवढेच नव्हे तर ज्या समाजात भृणहत्या, बालहत्या व नरबळी दिला जातो त्या समाजाची दशा लक्षात येते.


अशा या ढासळलेल्या, दुभंगलेल्या आणि अध:पतीत समाजात उच्च व श्रेष्ठ दर्जाची वैश्विक मुल्ये रुजवत बदल व परिवर्तन घडवणे गरजेचे आहे. आणि समाजाला सांस्कृतिक दृष्ट्या उच्य स्थानापर्यंत नेणे जरुरीचे आहे. अर्थातच अशा समाजातील प्रत्येक माणूस उच्य नैतिकता व उदात्त चारित्र्य संपन्न असला पाहिजे. नेमके हेच ध्येय व उद्देश घेवून इस्लाम आपल्या अनुयायांना व समाजाला उन्नत अवस्थेप्रत नेण्याचे कार्य करतो.


पैगंबर स्वतः निरक्षर होते. परंतू त्यांच्या जीवनसंघर्ष व चिंतनातून ज्ञानाचे महत्व लक्षात आले. त्यांनी ज्ञानाला प्रथमस्थानी आणले. त्यांचे कडे श्रेष्ठ गुण, उच्च नैतिकता आणि स्तुत्य सवयी होत्या. त्यांचे चारित्र्य निर्मळ, निष्कलंक व संशयातीत होते. त्यांच्या प्रामाणिक, खरेपणा व सचोटीने त्यांना तरुणपणीच 'अलअमीन' ( विश्वासू ) ही उपाधी मिळाली. पैगंबरांच्या तरुणपणी 'हिल्फ उल फजूल' नावाचे आघाडी संघटन स्थापन झाले होते. जे समाजातील दुर्बल व कमजोर लोकांवर होणाऱ्या शोषण, जुलूम, अन्याय, अत्याचार, हिंसा यापासून त्यांचे संरक्षण व सहाय्य करील. तसेच समाजातील पवित्र गोष्टींचा अनादर व बेकायदेशीर गोष्टींपासून अटकाव करील. या आघाडीमध्ये पैगंबर सामिल झाले होते. यातून ते चांगलेच प्रभावित झाले होते. पैगंबर म्हणजे गरीब, कमजोर, अनाथ, गुलाम यांचे सच्चे मित्र व रक्षकच होते. हाच तर इस्लाम व कुराणचा सार व अर्क आहे.


पैगंबर म्हणजे एक आदर्श वैश्विक व्यक्तिमत्व होते. त्यांचेजवळ श्रेष्ठ मानवी मुल्यांचा खजिनाच होता. त्यांचेजवळ सजगता, आत्मविश्वास, आशावाद, ठाम निश्चय असे. त्यांचे विचार आणि कृतीमध्ये कधीच फरक नव्हता. त्यांच्या कार्याची व्यापकता व स्वरूप लक्षात घेता ते एक आदर्श प्रेषित होते. त्यांचेवर सोपवलेले कार्य त्यांनी प्रामाणिकपणे पूर्ण केले. कोणतेही काम नाउमेदीने अर्धवट सोडले नाही. त्यांचे व्यक्तिमत्वात शारिरीक, मानसिक, नैतिक अशी कोणत्याही प्रकारची दुर्बलता नव्हती.

त्यांचेजवळ असलेली सहनशिलता व संयम वाखाणण्या सारखी होती. कारण जीवनामध्ये त्यांनी अनेक कठीण व दुर्धर प्रसंगांना तोंड दिले. पैगंबरां जवळ असलेली क्षमाशिलता म्हणजे एक उत्तम नमुनाच होय. त्यांना संपत्ती व सांसारिक साधन सामुग्री बाबत कोणतीही इच्छा नव्हती. आराम व सुखासिनतेची ही आस नव्हती. त्यांचे रहाणे, खाणे व पेहराव अतिशय साधा असे. कोणतेही काम कमी दर्जाचे नाही असे ते म्हणत. स्वतःचे काम स्वतः करीत. स्वतःचे कपडे शिवणे, चप्पल दुरुस्ती, घरकामात मदत, खड्डे काढणे, बांधकाम करणे असली कामे स्वतःच करीत.


त्यांच्या जीवनाचे अतिशय बारकावे उपलब्ध आहेत. त्यांची उक्ती, कृती, प्रवचने व शिकवण यांच्या सर्व नोंदी आहेत. त्यांचे जीवनात कोणतेही गूढ, गुपीत किंवा रहस्ये नाहीत. त्यांनी जी तत्वे व शिकवण दिली त्याचेच आचरण स्वतः केले.


पैगंबरांनी अतिशय साधे सोपे परंतू तर्कबुद्धी संगत व व्यवहार्य तत्वज्ञान सांगितले. सर्वश्रेष्ठ उत्कृष्टता व महत्तम परिपूर्णता त्यामध्ये होती. देवादिकांचा बाजार संपवून सत्य, अस्सल, खरा व शुद्ध एकेश्वराचा मार्ग दाखवला. पैगंबरांनी सर्वोत्तम धार्मिक, अध्यात्मिक, नैतिक व भौतिक विचारांच्या योगदानाने संपूर्ण मानवजातीचे आमुलाग्र उन्नयन, प्रगती व सुधारणा घडवून आणली. पैगंबरांनी एक उदात्त नैतिक जीवन व चारित्र्य याचा आदर्श आपल्या समोर ठेवला.


- शफीक देसाई.


संपर्क - ९४२१२०३६३२.

No comments:

Post a Comment