Monday, July 11, 2022

कुर्बानी



महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी. त्यात १ कोटी ३० लाख मुस्लिम. आपण १ कोटीच गृहीत धरू. पाच सदस्यीय कुटुंब गृहीत धरले तरी किमान २० लाख मुस्लिम कुटुंब महाराष्ट्रात राहतात. त्यापैकी केवळ १०% कुटुंबीयांची आर्थिक क्षमता कुर्बानी करण्याइतकी असल्याचे गृहीत धरले तरी किमान २ लाख मुस्लिम कुटुंबीयांनी आज कुर्बानी केली. तरीही महाराष्ट्रात एकाही अभ्यासकाला, समाज संस्थेला, सामाजिक संघटनेला २ लाख लोकांनी कुर्बानी का केली, हे जाणून घेण्याची गरज वाटली नाही. एखादा समाज कुर्बानी का करतो, त्यामागचे कारण काय आहे? तत्वज्ञान काय आहे? इतिहास काय आहे? भूमिका काय आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता नाही, की जिज्ञासा नाही की आतुरता नाही. मात्र तुम्ही कुर्बानी बंद करा म्हणून दूषणे द्यायला सारे मोकळे आहेत.
आता आजच्या कुर्बानी मागची आर्थिक उलाढाल समजून घ्या. मुस्लिमांनी कुर्बानीसाठी आणलेली ही २ लाख बोकडं आली कोठून? अर्थातच शेतीसोबत जोडधंदा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून, धनगरांकडून आणि काही भटक्या विमुक्त जाती जमातींकडून. मुस्लिमांनी ही बोकडं लुटली, जिंकली की लुबाडून आणली. नव्हे त्यांनी खरेदी केली. या खरेदीचा पैसा कोणाच्या खिशात गेला? सोनाराच्या, मारवाडीच्या, बामनाच्या, मदरशाच्या की मस्जिदीच्या? नव्हे तो पैसा वर्षाकाठी काहीतरी हातात यावं म्हणून पायपीट करून गुरे राखणाऱ्याच्या खिशात गेला. किती गेला? प्रत्येक बोकडाचे किमान १० हजार जरी गृहीत धरले तरी किमान २०० कोटी रुपये त्यांच्या खिशात गेले. ज्यांच्या खिशात गेले, त्यांचा धर्म काय? हिंदू. कोणते हिंदू? मागास, भटके, विमुक्त दारिद्री रेषेखालील हिंदू.
मुस्लिम समाज त्यांच्या दोनपैकी एकाही सणात घर, गाडी, दागदागिने अथवा इलेक्ट्रॉनिक सारख्या महागड्या वस्तूवर खर्च करीत नाही. समस्त भारतीय सणांत पैसे खालून वरच्या बाजूला प्रवाहित होतो. लोक बंगले घेतात, घरे घेतात, गाड्या घेतात, दागदागिने घेतात, इलेक्ट्रॉनिक्स घेतात. पैसा खालून वरच्या दिशेने प्रवाहित होतो. मात्र मुस्लिमांचे दोन्ही सण पैशाच्या प्रवाहित दिशा बदलतात. या सणांच्या वेळी पैसा वरून खाली प्रवाहित होऊ लागतो. समाजातील गरीब, उपेक्षित, वंचित आणि नाही रे वर्गाच्या हातात पैसा जाऊ लागतो. भांडवली वर्गाचे मुस्लिमांच्या सणांशी असलेले शत्रुत्व या धर्तीवर समजून घ्या.
मुजाहिद शेख (इस्लामचे अभ्यासक औरंगाबाद )

No comments:

Post a Comment