Monday, May 18, 2020

अजान आहे तरी काय?


----------------------------------------------------
माझ्या कालच्या अजान आणि लाऊडस्पीकर या लेखाला मोठा प्रतिसाद मिळाला. तसा हा लेख तीन वर्षांपूर्वीचा होता. सोनू निगमने उपस्थित केलेल्या अजानच्या वादावर लिहिला होता. यावेळेस होता तसाच पोस्ट केला. लेखाला या वेळेसही अभूतपूर्व प्रतिसाद भेटला. सोबतच हा प्रश्नही विचारण्यात आला की अजान आहे तरी काय? तर आजच्या या लेखामध्ये आपण अजान काय असते हे समजून घेऊयात. ज्यांना लाऊड स्पीकरचा मुद्दा हवा आहे, त्यांनी मागील लेख वाचवा.
अजान काय आहे?
अजान नमाजसाठी दिली जाणारी हाक आहे. जेव्हा नमाजची वेळ होते, तेव्हा मस्जिदीमध्ये लोकांनी नमाज अदा करण्यासाठी यावे म्हणून अजान दिली जाते. प्रत्येक धर्मस्थळाच्या लोकांना बोलाविण्याच्या आपल्या काही पद्धती असतात, इस्लाममध्ये अजानची पद्धत वापरण्यात आली आहे. म्हणजे एक व्यक्ती मस्जिदीत उभे राहून इतरांना हाक देतो आणि त्याच्या हाकेवर नमाज अदा करण्यासाठी लोक एकत्र येतात. ही अजान दिवसातून पाच वेळेस दिली जाते. याशिवाय इतर कारणांनीही अजान दिली जाऊ शकते. त्याबद्दल स्वतंत्र लेखात चर्चा करूयात.
अजानची पद्धती:
अजानची ही पद्धत आजपासून ४००० वर्षे जुनी आहे. याचा उल्लेख कुरआनात आला आहे. अल्लाहच्या आदेशाने जेव्हा प्रेषित इब्राहीम [अलै.] यांनी काबागृहाची पुनर्बांधणी केली, तेव्हा अल्लाहच्या आदेशानुसार लोकांना बोलाविण्यासाठी अजान दिला. ही मानवी इतिहासातील पहिली अजान होती. अल्लाहने या अजानचा मान राखला आणि जगभरातून लाखो लोक दरवर्षी हज करण्यासाठी मक्केकडे कूच करू लागले. ही परंपरा मागील ४००० वर्षांपासून अखंडितपणे चालू आहे. मात्र कालांतराने या अजानचा लोकांना विसर पडला. तेव्हा आजपासून १४०० वर्षांपूर्वी सहकारी उमर [रजि.] यांच्या शिफारशीवर अल्लाहचे अंतिम प्रेषित मुहम्मद [स.] यांनी पुनर्स्थापना केली. नमाजसाठी हाक देण्यासाठी याच पद्धतीची निवड केली आणि नव्या शब्दांसह ही अजान देण्याचा आदेश सहकारी बिलाल [रजि.] यांना दिला. बिलाल [रजि.] यांनी दिलेली अजान आजपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम अखंडपणे दिवसातून पाच वेळेस केले जात आहे. मागील १४०० वर्षांत या कार्यात एकही वेळेचा खंड पडलेला नाही.
काय आहेत अजानचे शब्द?
अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर
अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर
अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह
अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह
अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलल्लाह
अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलल्लाह
हय्या अलस्सलाह
हय्या अलस्सलाह
हय्या अलल फलाह
हय्या अलल फलाह
अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर
ला इलाहा इल्ललाह
हे अजानचे शब्द आहे. जगभरात कोठेही जा. अमेरिका असो की आफ्रिका, आशिया असो की ऑस्ट्रेलिया, युरोप असो की रशिया, जपान असो की चाईना संपूर्ण जगात अजानचे हेच शब्द लोकांच्या कानावर पडत आहेत. दररोज, दिवसातून पाच वेळेस, प्रेषित मुहम्मद [स.] यांच्या १४०० वर्षांनंतरही. जसेच्या तसे. एखाद्या महापुरुषाच्या शिकवणीचे इतके काटेकोरपणे जतन करण्याचे दुसरे उदाहरण मानवी इतिहासात शोधूनही सापडत नाही. हीच ती अजान आहे, जी प्रेषितांच्या आदेशाने दिली गेली आणि हीच ती अजान आहे जी तुम्ही तुमच्या मोहोल्ल्याच्या मस्जिदीत रोज ऐकता.
काय आहे या शब्दांचा अर्थ?
आता आपण अजानच्या या शब्दांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. सविस्तर चर्चा करता येणार नाही. परंतु संक्षिप्तपणे जास्तीत जास्त आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
अल्लाहु अकबर – म्हणजे या सृष्टीचा निर्माता, रचयिता, पालनकर्ता महान आहे. अजानमध्ये हे शब्द सहा वेळेस उच्चारले जातात. चार वेळेस सुरुवातीला तर दोन वेळेस शेवटी.
अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह – म्हणजे मी साक्ष देतो की एकमात्र पालनकर्त्याशिवाय अन्य कोणीच पूजनीय नाही. तोच एकमात्र उपास्य आहे. हेच सर्वधर्मीय सत्य आहे, तत्व आहे. हे शब्द अजानमध्ये दोन वेळेस उच्चारले जातात.
अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलल्लाह – मी साक्ष देतो की मुहम्मद [स.] पालनकर्त्याचे प्रेषित आहेत. हे शब्द अजानमध्ये दोन वेळेस उच्चारले जातात.
हय्या अलस्सलाह – म्हणजे लोकहो, नमाज अदा करण्यासाठी या. हे शब्ददेखील अजानमध्ये दोन वेळेस उच्चारले जातात.
हय्या अलल फलाह – म्हणजे लोकहो, मरणोत्तर जीवनातील सफलतेकडे या. हे शब्ददेखील अजानमध्ये दोन वेळेस उच्चारले जातात.
ला इलाहा इल्ललाह – म्हणजे एकमात्र पालनकर्त्याशिवाय अन्य कोणीच पूजनीय नाही.
या व्यतिरिक्त अजानमध्ये इतर शब्दांची वाढ केली जाऊ शकते, परंतु काहीच कमी करता येत नाही. शब्दांची वाढ प्रसंगानुरूप केली जाऊ शकते. जशी पहाटेच्या अजानमध्ये ‘अस्सलातु खैरन मिनन नौम’ म्हणजे नमाज तुमच्या साखरझोपेपेक्षा जास्त लाभदायक आहे, या शब्दांची वाढ केली जाते. मुसळधार पावसाच्या वेळी ‘सल्लू फी रिहालिकुम’ म्हणजे लोकहो आहे तिथेच नमाज अदा करा, या शब्दांची वाढ केली जाते. बिकट प्रसंगी ‘सल्लू फी बुयुतिकुम’ म्हणजे लोकहो तुमच्या घरातच नमाज अदा करा, या शब्दांची वाढ केली जाते. या कोरोनाच्या कालावधीत आम्ही मस्जिदीत ‘सल्लू फी बुयुतिकुम’ ची वाढ करूनच अजान देत आहोत.
अजानमध्ये हिंदुविरोधी शब्द आणि घोषणा आहे काय?
अनेक सामान्य हिंदूंचा असा गैरसमज आहे की अजानमध्ये हिंदूविरोधी घोषणा दिल्या जातात. मुळात हा निव्वळ गैरसमज आहे, ज्याचा वास्तवाशी काहीच संबंध नाही. अजान जगभरात दिली जाते. मुस्लिम राष्ट्रांतही याच शब्दात दिली जाते. जगभरात अन्यत्र हिंदू नाहीत. तर मुस्लिम राष्ट्रांत तर बहुसंख्य मुस्लिमच आहेत. तेव्हा हा गैरसमज निव्वळ एक भ्रम आहे. अजानमध्ये कोणत्याच धर्मसमुदायाचा अपमानही केला जात नाही की घोषणाही दिल्या जात नाहीत. अजानचा उद्देश केवळ लोकांना नमाजची आमंत्रित करणे इतकाच असतो.
कोण देऊ शकतो अजान?
प्रत्येक ती व्यक्ती अजान देऊ शकते, ज्याला अजानचे शब्द मुखोद्गत आहेत. मी अगदी लहानपणापासून मस्जिदीत अजान देत आलोय. माझ्या जीवनातील पहिली अजान मी वयाच्या ६ व्या वर्षी दिली होती. जेव्हा मी पहिली वर्गात शिकत होतो. अगदी सहा वर्षाच्या बालकापासून साठ वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत कोणीही अजान देऊ शकतो. तसेच अजान केवळ मस्जिदीतच दिली जाऊ शकते असेही नाही. तुम्ही जेथे नमाज अदा करीत आहात, तेथे लोकांना बोलाविणे अपेक्षित आहे तर तुम्ही अजान देऊ शकता. आम्ही मित्र जेव्हाही फिरायला जातो, तेव्हा नमाजची वेळ झाली की अजान देऊ नमाज अदा करतो. अजानचा आवाज एकूण जवळ असलेला एखादा मुस्लिम येऊन सामील होतो.
अजानशिवाय नमाज होत नाही का?
व्यक्तिगत नमाजसाठी अजान अनिवार्य नाही. मात्र सामुहिक नमाजसाठी अनिवार्य आहे. सामुहिक नमाज अजान दिल्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून सामुहिक नमाज अदा करण्यापूर्वी अजान देणे बंधनकारक आहे.
ज्यांची अजान ऐकण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी
https://www.youtube.com/watch?v=_dEc0RM8ndY
----------------------------------------------------
#इस्लाम_मुस्लिम_गैरसमज
© Mujahid Shaikh
----------------------------------------------------
(टीप – जर तुम्हाला सदरील लेख उपयुक्त वाटत असेल तर हा लेख तुम्ही तुमच्या किंवा तुमच्या संस्थेच्या नावाने प्रकाशित करू शकता. सदरील लेखात लाभदायक फेरबदल करण्याची, मूळ मजकूर बदलण्याची खुली परवानगी लेखकातर्फे देण्यात येत आहे. हा लेख आहे तसा किंवा तुम्हाला अपेक्षित असलेल्या बदलांसह तुमच्या नावाने छापून समाज जागृतीच्या कार्यात आपला सहभाग नोंदवा.)

No comments:

Post a Comment