Sunday, February 20, 2022

कुठला शिवाजी आमचा ?




शिवाजी दोन छावणीत विभागला आहे. एका छावणीला तो हिंदूपदपातशहा व मुस्लिमांचा कर्दनकाळ म्हणून मिरवायचा आहे. तर दुसऱ्या छावणीसाठी तो केवळ कुळवाडी भूषणच नाही तर स्त्री-शूद्रातिशूद्रांच्या स्वराज्याचा राजा आहे. रयतेचा राजा आहे.
ज्यांच्या पूर्वजांनी, हयातीतच शिवाजीला साथ देण्याऐवजी त्याची वारंवार कोंडी केली त्या शिलेदारांचे वारसदार पहिल्या छावणीत आहेत. ही स्वराज्यद्रोह्यांची छावणी !
दुसरी छावणी ज्यांचे पूर्वज शिवाजीसाठी प्राणार्पणास सिद्ध झाले त्या बारगीरांची आहे. हे मुख्यतः काटक कष्टकरी आहेत, ज्यांना मावळे म्हटले जाते.
पहिल्या छावणीला शाहिस्तेखानाची तुटलेली बोटे, अफजलखानाचा कोथळा हा खूनखराबाच शिवाजीची ओळख बनवायचा आहे. पण याहून जास्त खूनखराबा केलेले पराक्रमी राजे इतिहासाच्या पानापानांवर तलवार परजताना दिसताहेत.
मग रयतेच्या मनात त्या महापराक्रमींना का स्थान मिळाले नाही ? याचे उत्तर इतिहासकार शेजवलकर अनाहूतपणे देऊन जातात.
शेजवलकरांनी शिवबाच्या उण्यापुऱ्या पन्नास वर्षांच्या आयुष्याची आठ भागात विभागणी केली व दाखवून दिले आहे की, त्यातील सात भाग हे शिवाजीच्या मुलकी कारभारातील व्यस्ततेचे आहेत व फक्त एक भाग लष्करी कारवायांचा आहे!
सतत कमरलेला तलवार लटकवलेला शिवाजी आम्हांला या स्वराज्यद्रोहींनी दाखवला आहे. रयतेच्या मनात स्थान मिळविलेला मुलकी कारभारातून आपले प्रजावत्सल मन सतत प्रगट करणारा शिवाजी त्यांनी दडवला.
शेती हा तत्कालीन अर्थव्यवस्थेचा कणा होता. महसूलाचा प्रमुख स्त्रोत तोच होता. हा शेतकरी निसर्गाच्या अवकृपेचा वारंवार बळी ठरतो, म्हणून त्याच्याकडून शेतसारा घेताना तो शेतीच्या उत्पादनाचे नियतकालिक अवलोकन करुन त्याप्रमाणे घ्यावा. जर पीकच पोटापुरते आले आहे तर शेतसारा माफ करावा. जिथे वरकड झाले आहे तेथे त्याप्रमाणातच पट्टी घ्यावी. बी बियाण्यास मोताद असणाऱ्यांना ते सरकारातून द्यावे आणि पीक आल्यावर ते उजवून घ्यावे. रोखीत मोबदला मागू नये. शेतकऱ्याला तोशीस पडेल असा व्यवहार अधिकाऱ्यांनी कदापि करु नये, अशी सक्त ताकीद देणारा राजा रयतेने त्याआधी अनुभवला नव्हता.
शेतजमिनची एकूण 17 प्रकारची प्रतवारी करून त्याप्रमाणे शेतकऱ्याची कुवत ठरविली जाई. केवळ किती क्षेत्र आहे यावर त्याची शेतसारा देण्याची कुवत निर्धारित केली जात नसे.
" रयतेच्या भाजीच्या देठासही तू निमित्त होता कामा नये. आंबा, साग आदी वृक्ष आरामाराचे बहुत उपयोगीचे. पण ही झाडे रयतेने आपल्या लेकरांसारखी वाढविली आहेत. ती तोडली असता त्यांच्या दु:खास पारावार काय ? हे वृक्ष धन्यास राजी करून रोकड मोजून घ्यावेत, बलात्कार सर्वथा न करावा ..." ही आज्ञापत्रातील काही वाक्ये आपल्याला शिवबा पिढ्यानपिढ्यांचे दैवत का बनला याचा प्रत्यय देतात.
शेतकऱ्याच्या बांधावर रमणारा, तलवारीवर नव्हे तर नांगरावर प्रेम करणारा आमचा शिवाजी आहे !
अफझलखानच्या बाजूने आपली पथके घेऊन उतरलेल्या शिळिमकर, बांदल, पिलाजी मोहिते, बाबाजी भोसले यांच्या वारसदारांनी आम्हाला शिवाजी शिकवू नये.
त्याचप्रमाणे मिर्झा राजे जयसिंगाला विजय मिळावा म्हणून यज्ञांआडून दक्षिणेची लाच लाटत स्वराज्याची सारी गुपिते मिर्झाला सांगून ज्यांनी शिवबावर नामुष्कीचा पुरंदर तह व आग्रा कैद लादली व दग्याने ज्यांनी संभाजी राजांना मोगलांकडे सुपूर्द केले त्या स्वराज्यद्रोही पळीपंचपात्रवाल्यांनी देखील आम्हाला शिवबा शिकवू नये !
ज्या आमच्या कष्टकरी मुस्लिम बांधवांच्या विरोधात सदोदित तुम्ही शिवाजी दाखवत आलात ते मुस्लिम शिवाजीशी जेवढे एकनिष्ठ राहिले तेवढे तुमचे पूर्वज राहिले नव्हते !
इतिहासाचे एक पान असे काढून दाखवा, जिथे शिवरायांच्या सोबत असणाऱ्या एका तरी मुसलमानाने त्यांना दगा दिलेला आहे.
एक पान असे काढून दाखवा, जिथे कुणी मांग, महार, बेरड, भिल्ल, रामोशी, भंडारी, कोळी, आग्री व सामान्य मराठा, कुणबी, माळी, धनगर, वंजारी आणि कारागीर जातीतून आलेल्यांनी शिवाजीशी दगलबाजी केली आहे.
आमचा शिवाजी हा हिंदूपदपातशहा नाही. गोब्राम्हण प्रतिपालक तर मुळीच नाही. तो रयतेसाठी, रयतेला घेऊन रयतेचे राज्य आणणारा, फक्त 'शिवबा' आहे !
- किशोर मांदळे, पुणे.




No comments:

Post a Comment