Sunday, February 20, 2022

कॉम्रेड पानसरेंनी सांगितलेला शिवाजी

 

" माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा गुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे.समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते. अशा नाट्यमय घटनांवर लक्ष खिळून राहिले म्हणजे मग खरे कर्तृत्त्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो, " नरहर कुरुंदकरांनी शिवाजी महाराजांच्या संदर्भात काढलेले हे उदगार शिवाजी महाराजांसह अनेक नेत्यांबाबत कमी अधिक प्रमाणात सत्य आहेत. आणि म्हणूनच शिवरायांवर आपण लादलेल्या देवत्वापलिकडे जावून आपणाला त्यांचे कार्य समजावून घेण्याची गरज आहे. या दृष्टीने कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहलेले ‘ शिवाजी कोण होता?’ , हे छोटेसे पुस्तिकावजा पुस्तक महत्वाचे आहे. पुस्तकाच्या नावापासूनच पानसरे यांची मांडणी सुरु होते. ‘ शिवाजी कोण होता?’ असा शिवाजीचा एकेरी उल्लेख पानसरे करतात तेव्हा ते शिवाजीचा अनादर करत नाहीत तर शिवाजीला माणसाच्या पातळीवर आणून त्याच्याभोवती असलेले देवत्व आणि अवताराचे अनाठायी वलय सहजी भेदतात. असा शिवाजी आपला असतो, अगदी जवळचा असतो.
भारत हे एक सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र आहे. लोकशाही ही राजकीय प्रणाली आपण अंगिकारिली आहे. आणि असं असतानाही आजच्या या लोकशाही समाजात वावरतानाही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्द्ल प्रचंड आदर आहे. आजच्या आधुनिक समाजाच्या आदर्शांपैकी ते एक आहेत. खरं म्हणजे, शिवाजी महाराज हे राजे होते. ते काही आजच्या सारखे लोकनियुक्त राष्ट्रप्रमुख नव्हते. राजेशाही ही व्यवस्था म्हणून आपण नाकारली आहे पण शिवराय मात्र आजही आपणां सर्वांना परमप्रिय आहेत. सुमारे साडे तीनशे वर्षांपूवी जन्मलेल्या शिवरायांचे गारुड आजच्या लोकशाही व्यवस्थेत वावरतानाही आपल्या मनावर का आहे ? कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहलेले ‘ शिवाजी कोण होता ?’ हे पुस्तक वाचताना या प्रश्नांची उत्तरे मिळत जातात. आणि महत्वाचे म्हणजे खरा शिवाजी कळत जातो. महाराजांमधील नक्की कोणत्या गुणवैशिष्ट्यांना आपण अंगिकारले पाहिजे, याची जाणीवही हे छोटेखानी पुस्तक करुन देते.
खरं म्हणजे तीन चारशे वर्षांपूर्वीच्या राजेशाही – सरंजामशाही व्यवस्थेत राजे येत असत आणि जात असत, सर्वसामान्यांच्या जगण्यात काही फरक पडत नसे. हे सांगताना पानसरे यांनी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी ‘ महिकावतीची बखर’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत जे म्हटले आहे ते उध्दृत केले आहे , ‘ गेल्या तीन हजार वर्षात हिंदुस्थानात जी काही देशी आणि परदेशी सरकारे होऊन गेली ती सारी पोटभरु चोरांची झाली. आणि सरकार म्हणजे उपटसुंभ चोरांची टोळी अशी गावक-यांची अंतःस्थ प्रामाणिक समजूत असे.’ याच स्वरुपाचा कार्ल मार्क्सचाही दाखला पानसरे देतात. असे असताना शिवाजी बाबत मात्र वेगळे कसे घडले ? या राजासाठी खेड्यापाड्यातील लोक जीव द्यायला देखील तयार होते. शिवरायांचे वेगळेपण नेमके कशात होते ?
आजच्या लोकशाहीच्या थांब्यावरुन शिवाजी महाराजांकडे विश्लेषक दृष्टीने पाहताना त्यांच्या रुपाने आपल्या वारशाचा मथितार्थ आपल्याला कळू शकेल. अर्थात तो नेमक्यापणे कळण्यासाठी रुढ इतिहासाने, धूर्त इतिहासकारांनी देऊ केलेले चष्मे आपण नाकारले पाहिजेत, आणि आपल्या स्वतःच्या निखळ नजरेने काळाच्या या बुरुजावर उभे राहून शिवाजी नावाच्या भूतकाळाकडे नव्याने पाहिले पाहिजे.
शिवाजी महाराजांचे वेगळेपण -
शिवाजी राजांचे वेगळेपण हे की त्यांनी आयत्या पीठावर रेघोटया मारल्या नाहीत. स्वराज्य त्यांनी स्वतः स्थापन केले. स्वतःच्या आणि आपल्या जीवाला जीव देणा-या मित्रांच्या, सहका-यांच्या मदतीने ते वाढविले, राखले. आजच्या युगात शिवाजी समजून घेताना घराणे आणि कुळाच्या मोठेपणात अडकलेल्या सगळ्यांनी शिवाजी नावाच्या माणसाचे हे वेगळेपण समजावून घेतले पाहिजे.
" कुळ माझे मोठे,जात माझी मोठी
बढाई असली,नको मारु खोटी
तुझे कर्म तुझा,ठरविते भाव
जात कुळगोत्र,नको आणू आव
तथागत म्हणे,समान सगळे
श्रेष्ठ कनिष्ठ ना,कुणी ना वेगळे
कर्म तुझे सांगे,तुझे खरे मोल
कुळ,गोत्र,जात,वल्गना या फोल " ( धम्मधारा - प्रदीप आवटे)
तथागत गौतम बुध्दाच्या विचारांचे मूर्तिमंत प्रतिबिंब आपल्याला शिवाजी राजांच्या चरित्रात दिसून येते. शिवाजी महाराजांचा जयजयकार करताना पारंपारिक सरंजामशाही व्यवस्थेला प्रखर विरोध करण्याची हिंमत म्हणून तर असायला हवी. शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापन केले हे जसे त्यांचे वेगळेपण आहे तसेच हे राज्य स्थापन करण्यामागील त्यांचा हेतूही केवळ स्वतःची महत्वाकांक्षा तडीस नेण्याचा नव्हता. स्वराज्य स्थापनेमागील त्यांचा हेतू लोककल्याणकारी होता. त्याकाळीच्या इतर राजांप्रमाणे केवळ स्वतःच्या तुंबडया भरणे, त्यांच्या गावीही नव्हते.
शिवाजी - रयतेचा राजा
शिवाजी महाराज हे मध्ययुगीन महाराष्ट्रातील खरेखुरे रयतेचे राजे होते. त्यांच्यापूर्वी अनेक राजे आले गेले तरी लोकांचे जे प्रेम महाराजांना मिळाले ते इतरांना मिळाले नाही, याचे कारण शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराच्या पध्दतीत होते. त्या काळी गावोगावी कुलकर्णी, देशमुख, देसाई, पाटील , खोत, मिरासदार, देशपांडे असे वतनदार लोक होते. राजा कुणीही असला तरी गावोगावी खरे राज्य असे ते या वतनदारांचे ! शेतक-यांकडून हवा तसा अगदी दहा दहा पट सारा वसूल करणे, तो सरकारातही जमा न करता ऐषोराम करणे, हे वतनदार वर्गाचे सर्वसाधारण चारित्र्य होते.
या अन्याय्य सामाजिक सांगाडयाला हात घालण्याचे धाडस राज्यकर्ता म्हणून शिवाजी महाराजांनी दाखवले. त्यांनी शेतजमीनीचे यथायोग्य डॉक्युमेंटेशन केले. प्रत्यक्ष उभ्या पिकावरुन सारा ठरे. सारा आकारणीची निश्चित पध्दत होती. शेतकरी सारा धान्यरुपात किंवा नगद स्वरुपात भरु शकत असे. दुष्काळात शेतक-याला तगाई मिळे. ती फेडण्यासाठी चार पाच वर्षांची मुदत असे. शिवाजी राजांनी वतनदार पध्दतीचे कंबरडेच मोडले. त्यांनी सारा वसुली करता वेगळे अधिकारी नेमले. या सुधारणांमुळे रयत सुखावली नसेल तर नवल. रयतेच्या गवताच्या काडीची सुध्दा काळजी घेणारा असा राजा जनतेच्या गळ्यातील ताईत होईल, यात काय नवल ! आज आधुनिक व्यवस्थेत देखील लोकशाहीच्या आधारे अशी नवी सरंजामशाही, नवे वतनदार फोफावताना, दृढ होताना आपण पाहतो तेव्हा महाराजांनी साडेतीन शतकांपूर्वी केलेल्या कामाचे महत्व आपल्या लक्षात येते. आज पंचायत राज व्यवस्थेत सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे प्रयत्न हव्या त्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत नाहीत. त्या करता प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. शिवाजी महाराजांनी केलेल्या या मूलभूत आर्थिक सुधारणांचे कौतुक श्रीपाद अमृत डांगे सारखे कम्युनिस्ट विचारवंत देखील करतात, ते याचमुळे.
शिवाजी महाराजांचा स्त्री विषयक दृष्टिकोन –
गरीब कुणब्याच्या पोरीवर अत्याचार केलेल्या रांझ्याच्या पाटलाला शिवाजी राजांनी कोणती शिक्षा दिली, हे आपण सारेच जाणतो. बेळवाडीचा किल्ला जिंकणा-या आपल्या सेनापतीने सकुजी गायकवाडने विजयाच्या उन्मादात त्या किल्ल्याच्या किल्लेदार असणा-या सावित्री देसाईवर बलात्कार केला, तेव्हा आपल्याच सेनापतीची गय न करता महाराज त्याला आजन्म तुरुंगात डांबतात. कठुआतील आठ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करणारे केवळ आपल्या धर्माचे आहेत म्हणून त्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणारे कोणत्या तोंडाने महाराजांचा जयजयकार करु शकतात ? ‘बघतोस काय, मुजरा कर,’ म्हणणा-यांना महाराज कळू शकत नाहीत. महाराज म्हणजे गुर्मी आणि अहंकार नव्हे, हे समजायला हवे.
शिवाजी राजांच्या राज्याची भाषा –आपल्या राज्याची भाषा कोणती असावी, याबाबत शिवाजी राजांनी जो विचार केलेला आहे तो त्यांच्या राज्यकारभारविषयक दृष्टीकोनाचा निदर्शक मानता येईल. राज्यकारभारात फारसी भाषेचे वर्चस्व असणा-या काळात शिवाजी महाराज ‘राज्यव्यवहार कोश’ निर्मिती करतात आणि राज्यातील प्रशासकीय व्यवहार प्राकृतात करण्याची पध्दत सुरु करतात. राजा आणि राज्य लोकांच्या भाषेत बोलले पाहिजे, लोकांच्या भाषेत चालले पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याला लोकांच्या सुख-दुःखाचे भान पाहिजे. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य हे या सर्व निकषांवर खरे उतरते आणि म्हणूनच ते ख-या अर्थाने रयतेचे राज्य होते.
भारताच्या स्वातंत्र्यावर १९६० साली महाराष्ट्राची निर्मिती झाली. भाषावार प्रांत रचनेसाठी अनेक संघर्ष झाले, संयुक्त महाराष्ट्राचा लढा अगदी काल परवाचा वाटावा एवढा अलिकडला आहे. मराठी आपली राजभाषा झाली पण स्वातंत्र्यपूर्व काळात जी खंत माधव ज्युलियन यांनी व्यक्त केली होती –
‘ मराठी असे आमुची मायबोली
जरी आज ती राजभाषा नसे’
ती खंत आता त्यांच्याच शब्दांत थोडा बदल करुन सांगावयाचे तर –
‘मराठी असे आमुची राजभाषा
जरी आज ती मायबोली नसे’
अशी विपरित झाली. राज्यनिर्मितीचा अर्धशतकाहून अधिक वाटचालीनंतरही न्यायालये आणि इतर अनेक शासन व्यवहारात मराठी आणण्यात आपल्याला यश मिळाले नाही. आता तर मराठी शाळांचा टक्का घटतो आहे. शिवाजी राजांच्या चरित्राची भाषा विषयक धोरणासंदर्भातील बाजू आजच्या वर्तमानात आपण कसे पाहणार आणि त्यातून काय शिकणार, हा ही कळीचा मुद्दा आहे.शिवाजी राजांचा संघर्ष म्हणजे हिंदू – मुस्लिम संघर्ष ?
उजवे विचारवंत, इतिहासकार शिवाजी राजांना ‘ गोब्राम्हण प्रतिपालक’ म्हणून संबोधतात. त्यांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणतात आणि त्यांनी एकूणच आयुष्यभर केलेला संघर्ष हिंदू विरुध्द मुस्लिम अशा रंगात रंगविला जातो. तुमचे माझे सर्वांचेच सखोल वाचन हरवलेले असताना आणि वॉटसअप हा आपल्या माहितीचा प्रमुख स्त्रोत असणा-या विलक्षण काळात आपण शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे डोळे उघडून पाहिले पाहिजे आणि जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या या हिंदू मुस्लिम द्विध्रुवात्मकतेचा छेद घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांनी केलेल्या एकूण लढाया आपण पाह्यल्या तर जेवढया लढाया त्यांनी मुस्लिम राजवटींविरुध्द केल्या तेवढाच संघर्ष त्यांना मोरे, मोहिते, सावंत, दळवी, सुर्वे, निंबाळकर अशा आपल्याच लोकांविरुध्द करावा लागला. त्या काळी मोगल आणि चारी शाह्या मुसलमान असल्या तरी त्यांच्या पदरी असणारे अनेक सरदार मराठा होते. औरंगजेबाच्या वतीने मिर्झाराजे जयसिंगांसारखा रजपूतच महाराजांवर चालून आला होता. दुसरीकडे आपण शिवाजीच्या सहका-यांची नावे पाहिली तर त्यांना आग्र्याहून हिकमतीने पळून जाण्यात मदत करणारा मदारी मेहतर कोण होता, मुसलमानच ! शिवाजी राजांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान कोण होता, मुसलमानच ! आरमार दल उभारण्याची दूरदृष्टी दाखवणा-या महाराजांचा आरमार प्रमुख देखील दर्यासारंग दौलतखान हा ही मुसलमानच होता. ही यादी एवढ्यावरच थांबत नाही, ती खूप मोठी आहे आणि ती बोलकी आहे. कॉम्रेड पानसरे यांनी रियासतकार सरदेसाईंचा एक संदर्भ दिला आहे. १६४८ मध्ये शिवाजी राजांच्या सैन्यात सामील होण्याकरता पाचसातशे पठाण आले तेव्हा राजांना गोमाजी नाईक पानसंबळ यांनी एक सल्ला दिला –
‘ तुमचा लौकिक ऐकून हे लोक आले आहेत, त्यांस विन्मुख जाऊ देणे योग्य नाही. हिंदूंचाच संग्रह करु, इतरांची दरकार ठेवणार नाही, अशी कल्पना धरिली तर राज्य प्राप्त होणार नाही. ज्यास राज्य कारणे अठरा जाती चारी वर्ण यांस आपापले धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करुन ठेवावे.’आजच्या परिभाषेत बोलायचे तर राज्य ‘सेक्युलर’ असणे का गरजेचे असते, हेच गोमाजी नाईक पानसंबळ जणू समजावून सांगताहेत. ज्याने त्याने आपापले धर्माप्रमाणे चालावे, त्यात राजाने ढवळाढवळ करु नये, भेदभाव करु नये, ही समज महाराजांच्या सामान्यातल्या सामान्य सहका-यालाही होती . ही समज आजच्या काळात हरवत चाललेली असताना शिवाजी राजे निव्वळ आठवणे नव्हे तर अनुसरणे आवश्यक आहे. शिवकालात मुसलमान राजवटी दुस-या स्वधर्मिय राजवटीविरुध्द लढताना दिसतात, हिंदू राजे हिंदू राजांविरुध्द लढताना दिसतात. याचा अर्थ मध्ययुगीन काळातील या संघर्षाकडे हिंदू मुस्लीम या नेहमीच्या भिंगातून पाहण्याचा मूर्खपणा करु नये. या संदर्भात हिंदूवर जिझिया कर बसविला या बद्द्ल शिवाजी राजांनी औरंगजेबाला लिहलेले पत्र मोठे बोलके आणि महाराज धर्माकडे कोणत्या नजरेने पाहत होते, हे स्पष्ट करणारे आहे. या पत्रात महाराज सुरुवातीला औरंगजेबास अकबराची आठवण करुन देतात. त्यांनी सर्व धर्माच्या आपल्या प्रजेला न्यायबुध्दीने वागविले म्हणून तर जनता त्यांना ‘जगदगुरु’ म्हणे, हे सांगतात. आणि पुढे लिहतात , ‘कुराण हे अस्मानी किताब आहे. या पुस्तकात ईश्वराला ‘ जगाचा ईश्वर’ म्हटले आहे, केवळ ‘ मुसलमानांचा ईश्वर’ म्हटलेले नाही. कारण हिंदू मुसलमान या जाती ईश्वरासमोर एकरंग आहेत. मुसलमान लोक मशिदीत बांग देतात, ती ईश्वराची स्तुती होय आणि हिंदू लोकही मंदिरात घंटा वाजवून ईश्वराची स्तुतीच करतात. म्हणून जातिधर्मावर जुलूम करणे भगवंतांशी वैरत्व करणे होय.’राजाचा धर्म हाच त्याच्या राज्याचा आणि राजकीय संघर्षाचा धर्म नसतो, नव्हे तो नसावा, हे न कळणा-या लोकांनी महाराजांना आणि त्यांच्या संघर्षाला धार्मिक रंगात रंगविण्याचे कारस्थान रचले आहे. हिंदू साधू संतांचा आदर करणारे महाराज याकुत बाबा या मुस्लिम संताचाही आदर सन्मान करत, हे लक्षात घेतले तर भगव्या हिरव्याच्या रंगापलिकडील खुल्या आभाळात विराजमान झालेले शिवाजी महाराज आपल्याला कळू शकतील.
शिवाजी राजांच्या व्यक्तित्वाला काळाच्या मर्यादा नव्हत्या असे नाही. प्रत्येक महापुरुषाच्या व्यक्तित्वाला त्या असतात. राज्याभिषेकासाठी पुरोहितशाहीचे म्हणणे मान्य करणारे महाराज पाहताना काळाच्या अपरिहार्य चौकटीची आपल्याला कल्पना येते. पण त्याच वेळी मुसलमान झालेल्या नेताजी पालकर आणि बजाजी निंबाळकरांना महाराज हिंदू धर्मात परत घेतात. केवळ परत घेतात असे नाही तर निंबाळकरांशी स्वतःच्या मुलीचा विवाह लावतात. याचा अर्थ आपण नीट समाजावून घेतला पाहिजे. शिवाजी राजे धार्मिक जरुर होते पण ते धर्मांध नव्हते. औरंगजेब अथवा इतर कोणत्याही मुसलमान राजवटीविरुध्दचे त्यांचे युध्द हे धर्मयुध्द नव्हते. जी गोष्ट धर्माची तीच जातीची . शिवाजी राजे खरं म्हणजे केवळ मराठ्यांचे देखील नव्हते. अठरापगड माणसं त्यांच्या सोबत होती. ब्राम्हणांपासून न्हावी, रामोशी, महार, मांग अशी सगळ्या जातीची माणसं महाराजांसोबत होती, त्यांच्या जीवाभावाची होती. त्यांच्या हेरखात्याचा प्रमुख असणारा बहिर्जी नाईक हा रामोशी होता. शिवाजी राजांनी अस्पृश्य मानल्या जाणा-या अनेकांना किल्लेदार आणि त्यांच्या मगदूराप्रमाणे विविध पदावर नेमले होते. शिवाजी राजांच्या धार्मिक आस्थेला खुलेपणाची, मोकळ्या अवकाशाची आस होती. म्हणूनच सामूहिक सर्जकतेचे मूर्तिमंत स्वरुप असणारे राज्य महाराष्ट्रात साडेतीनशे वर्षांपूर्वी अवतरु शकले. हे स्वराज्य कोण्या एका धर्माची, जातीची मिरासदारी नव्हती. महाराष्ट्रातील प्रबोधन काळात महात्मा फुले शिवाजीची समाधी शोधतात, त्याच्यावर ‘कुळवाडी भूषण’ असा गौरव करत पवाडा रचतात. याच फुल्यांना गुरुस्थानी मानत आंबेडकर आपली सामाजिक चळवळ संविधानापर्यंत नेतात. हा सारा मूल्यात्मक प्रवास आपण समजून घेतला पाहिजे. आज शिवाजीचे नाव घेऊन जातीजातीमध्ये भांडणे लावण्याचे मनोहर, मनाला भिडणारे आणि भेडवणारे प्रकार पाह्यला मिळत असताना शिवाजीचे भीमनगर मोहल्ल्याशी असणारे जैव नाते आपल्याला समजायला हवे. आज शिवाजीच्या नावावर अनेकांनी राजकीय वतनदारी सुरु केली आहे. राजकीय स्वार्थाचा रंग फासत आपल्याला हवा तसा शिवाजी रंगवणा-या या सगळ्यांपासून चार हात दूर राहण्यात शहाणपण आहे. आपल्या डोळ्यांदेखत होणारे आपल्या लाडक्या राजाचे अपहरण आपण समंजसपणे रोखले पाहिजे. शिवाजीचे नाव वापरुन आपल्याला वेगवेगळया अस्मितांमध्ये झुंजवण्याचा खेळ राजकीय शक्ती खेळत आहेत. आणि आपण वेड्यासारखे महाराजांचे स्मारक, तिथल्या पुतळ्याची कमी जास्त होणारी उंची या वादात अडकलो आहोत. शिवाजीला समजावून घेण्याकरता पुतळ्याची नव्हे आपल्याला आपली बौध्दिक उंची वाढविण्याची गरज आहे. खोटया अस्मितांना गोंजारणे आता बंद करु या.कॉ गोविंद पानसरे यांचे ‘ शिवाजी कोण होता ?’ हे पुस्तक वाचताना रयतेवर प्रेम करणारा, राजधर्म पाळणारा राजा, परंपरागत अन्याय्य राजकीय व्यवस्था मोडून काढणारा बंडखोर, स्त्रीचा कमालीचा आदर करणारा एक सुसंस्कृत माणूस, राजभाषेविषयी विचार करणारा राजकीय धुरिण अशा अनेक रुपात शिवाजी राजे आपल्यासमोर येतात.
शिवरायांची ही इतिहासाशी सुसंगत आणि वस्तुनिष्ठ प्रतिमा आजच्या लोकशाही राजकीय व्यवस्थेला अधिक बळ देणारी आहे. सर्वसामान्य जनतेला नवा आत्मविश्वास देणारी आहे, हिंदू मुस्लिम भेदभावापलिकडे जाऊन, जातिभेदापलिकडे जाऊन माणसांसाठी नवे राज्य उभं करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. कुणी काही म्हटले तरी आपला शिवाजी हा आहे, हे आपण विसरता कामा नये. म्हणून तर आज साडे तीनशे वर्षांनंतरही रोज या रयतेच्या राजाची आठवण येते आणि सह्याद्रीचे खुले वारे गाऊ लागते –
‘ माझ्या घरची विशाल दारे, खुशाल ही राहोत खुली
मज गरीबाची कांबळ – वाकळ सकळांसाठी अंथरली.’
- डॉ प्रदीप आवटे



No comments:

Post a Comment