A message in its most general meaning is an object of communication. It is something which provides information or message; it can also be this information or message itself.
Sunday, October 23, 2022
सावरकर, गांधी आणि इतिहासाचा विपर्याय 'भटकभवानी" या पुस्तकातून
© समीना दलवाई
दादरच्या मॅजेस्टिक बुक स्टॉलमध्ये पुस्तकं चाळत होते. काऊंटरवर गेले तेव्हा कोणी गृहस्थ सावरकरांच्या पुस्तकांबद्दल भक्तिभावाने विचारणा करीत होते. टेबलावर बसलेले काका 'तथाकथित सावरकर' अशा नावाच्या नवीन पुस्तकाची माहिती देऊ लागले.
ते म्हणाले, “आजकालच्या या पिढीला माहीतच नाही सावरकर काय आहेत ते. इतक्या प्रकारच्या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत की ते जहाजावरून पळालेच नाहीत वगैरे. खरा इतिहास राहणारच नाही मग.'
मला राहवेना. मी विचारलं, "गांधींच्या खुनात नव्हते का ते?" दुकानात शांतता पसरली.
कोणी तरी विचारलं, "मॅडम तुमचं काय मत आहे?"
मी म्हटलं, “मी फोटो तर पाहिलाय बुवा, खुनाच्या खटल्या वेळी आरोपींत बसलेल्या सावरकरांचा. गोपाळ गोडसेच्या 'गांधीहत्या आणि मी' या पुस्तकात उल्लेखही आहेच त्यांचा. हा इतिहास सांगायचा नाही का आजच्या पिढीला ?"
मॅजेस्टिकमधल्या काकांना सावरकरांचं 'सहा सोनेरी पाने' हे पुस्तक माहीत होतंच. या पुस्तकात सावरकर मुस्लिम स्त्रीवर बलात्कार करणं हे कसं योग्य आहे याची कारणमीमांसा देतात. शिवाजी महाराजांना सद्गुण विकृती होती म्हणतात. कारण कल्याणच्या सुभेदाराची सून ताब्यात आली होती तिला त्यांनी परत पाठविलं.
“त्या काळात सावरकरांची अशी धारणा होती. त्याला टू नेशन थिअरी म्हणतात. " मॅजेस्टिक काकांनी भलावण केली.
"मग सावरकर आणि जिन्ना हे दोघे भाऊ भाऊच की!" मी उद्गारले. यावर ते भलतेच चपापले. कमाल आहे नाही? दोघांनाही दोन धर्म आणि दोन देश ही संकल्पना प्रिय. हिंसाचाराचा वापर मान्य. मग आपल्याला जिन्ना अप्रिय अन् सावरकर प्रिय, असं का ?
आजकाल बऱ्याच प्रौढांची अशी तक्रार असते की, नव्या पिढीला इतिहास ठाऊक नाही. खरेच आहे म्हणा. आमच्या शालेय पाठ्यपुस्तकांत नथुराम गोडसेचा उल्लेख 'माथेफिरू तरुण' एवढाच होता. हिंदुत्ववादाचं विष अंगात भिनलेला एक सुशिक्षित उच्चवर्णीय पुणेरी मराठी तरुण असा कधीच नव्हता. नव्या पिढीला इतिहास शिकवायला निघालेल्या कोणी यावर टीका केलेली दिसली नाही.
खोटा इतिहास आपण तूर्तास बाजूला ठेवू. अस्वस्थ करणारी बाब ही की, राष्ट्रपित्याचे खुनी आमचे हिरो. का मारलं पुण्याच्या ब्राह्मणांनी इतक्या वयस्क नेत्याला? असे किती काळ जगले असते गांधीजी अजून?
हिंदुत्ववाद्यांना केवळ गांधी हा माणूस मारायचा नव्हता, त्यांची विचारप्रणाली
मारायची होती. का ओळखतं जग गांधींना ? काही वर्षांपूर्वी लंडनमध्ये राहात असताना मी एका चिकनच्या दुकानात
शिरले. चिकन कापणारा अल्जेरीयन आहे हे कळल्यावर मी म्हणाले, " तुमचा तर स्वातंत्र्यदिन आहे ना आता जुलैमध्ये ? किती वर्षे लढून मिळविला तुम्ही."
तो भलताच खुश झाला.
मी भारतीय आहे हे कळल्यावर म्हणाला, “पण आमची क्रांती रक्तरंजित, तुमची शांतीपूर्ण. तुमच्याकडे गांधी होते ना!'
त्या अल्जेरीयन माणसाला रक्ताची किंमत माहीत होती. फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या आफ्रिकन देशाने १९५४ ते १९६२ या आठ वर्षांत रक्तरंजित यादवी पाहिलेली आहे. त्याच्या दृष्टीने भारतीय फारच नशीबवान. त्यांना गांधींसारखा नेता लाभला. ज्याने परकीय सत्तेकडून देश परत घेतला आणि तोही प्रेमाने, शांतीने, अहिंसेने !
ज्या एका भारतीयाला सारं जग मानतं, ज्याच्यासाठी नेल्सन मंडेला ३० वर्षांनी तुरुंगातून सुटल्यावर स्वदेशी जाण्याऐवजी आधी भारतभेटीला आले, त्याला मारण्याचा कट भारतातच रचला जावा आणि आम्ही भारतीयांनी मारेकऱ्यांबद्दल आदराने बोलावं ! इतिहासाचा याहून विपर्यास तो काय ?
© दीपक कसाळे fb वॉल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment