Thursday, July 10, 2025

धडा - डोंगर दादा

 डोंगरदादा फारच दुःखी होता. एकटेपणामुळे कष्टी होता. तो सारखा विचार करायचा, काय करावे ? आपल्याला कुणाची सोबत नाही. संगत नाही. कोणी नाही बोलायला, कोणी नाही हसायला, कोणी नाही खेळायला.

एकदा एक नवलाची गोष्ट घडली. एक छोटेसे रोपटे डोंगरदादाच्या कुशीतून हळूच वर आले. डोंगरदादापाशी उभे राहिले. टकमक टकमक पाहायला लागले. डोंगरदादाला जरा घाबरलेच, पण धीर करून डोंगरदादाला त्याने विचारले, “डोंगरदादा, डोंगरदादा, राहू का मी इथं ? मला देशील का तू आसरा ?" डोंगरदादाला खूप आनंद झाला. तो म्हणाला, "वा ! वा ! राहा की खुशाल. तुझं इथं स्वागतच आहे. '
रोपटे डोंगरदादाच्या मांडीवर जाऊन बसले. डोंगरदादाने त्याला खाऊपिऊ घातले. रोपट्याचे मोठे झाड झाले. मग दुसरी रोपटी आली. तीही डोंगरदादाने वाढवली. डोंगरदादाकडे आता खूप झाडे झाली.
काही दिवसांनी धिटुकल्या वेली आल्या. झाडांच्या भोवताली जमल्या. हातात हात धरून फेर धरू लागल्या. मग काही बुटकी झुडपे आली. माना डोलावत उभी राहिली. त्यांच्यासोबत होते इवले इवले गवत. फारच होते लाजत. ते हळूच बिलगले डोंगरदादाला. गवताचा मऊ स्पर्श झाला, डोंगरदादाला गुदगुल्या झाल्या.
काही दिवसांनी डोंगरदादा झाडाझुडपांनी भरला. गवतवेलींनी सजला. रंगीबेरंगी फुलांनी नटला. खूपच शोभून दिसू लागला. डोंगरदादाचे जंगल झाले दाट, मग काय विचारता त्याचा थाट! डोंगरदादाचे जंगल सिंहाच्या दृष्टीस पडले. तो डोंगरदादाकडे आला. आयाळ झुलवू लागला. डोंगरदादाच्या कुशीत होती झाडेझुडपे गाढ झोपलेली. सिंहाने गर्जना केली, तेव्हा झाडे, झुडपे, वेली, फुले थरथरली. खडबडून जागी झाली.
डोंगरदादाने सिंहाकडे पाहिले. त्याला विचारले, “काय झालं रे बाबा ? एवढ्या मोठ्याने असा का ओरडतोस ? " सिंह म्हणाला, “डोंगरदादा, क्षमा करा. पाहिलं तुमचं रान आणि हरपलं माझं भान; म्हणून केली मी गर्जना. इथं दाट झाडी आहे. हवा कशी थंड आहे. राह का मी इथं ?"
डोंगरदादा म्हणाला, “हो, हो, अगदी आनंदानं. ही पाहा ऐसपैस गुहा. यात तू खुशाल राहा."
सिंह खूश झाला. तो गुहेत राहायला लागला. जंगलात रुबाबात फिरायला लागला.
डोंगरदादाचे जंगल पाहून अनेक पशू यायला लागले. डुलत डुलत आली वाघोबाची स्वारी. सोंड हालवत आला हत्ती. मान वळवत जिराफ आला. शेपूट उभारत कोल्हा आला. डोळे मिचकावत अस्वल आले. पळत लांडगे आले. सुंदर सुंदर हरणे आली, तुरुतुरु धावायला लागली. गोजिरवाणे ससे आले, टुणटुण उड्या मारायला लागले. पळत वाकुल्या दाखवत माकडे आली, फांदयांवर झोके घेऊ लागली..
डोंगरदादाने सगळ्यांना आसरा दिला. सगळ्या प्राण्यांचा गलबला सुरू झाला. डोंगरदादाला आनंद झाला.
डोंगरदादाने सगळ्या प्राण्यांना बजावले. भांडणतंटा करू नका. दंगामस्ती करू नका. हिरव्यागार जंगलात सगळे राहा आनंदात. हळूहळू जंगलातील झाडे फळाफुलांनी बहरली. त्यांचा घमघमाट सगळीकडे पसरला. दूरदूरच्या पक्ष्यांपर्यंत पोचला. सारे पक्षी वेगाने आले, घिरट्या घालायला लागले. घरटी बांधून आनंदाने राहू लागले. पक्ष्यांची झुंबड उडाली. त्यांची किलबिल सुरू झाली.
पशुपक्ष्यांना कळून आले - झाडे आपल्या उपयोगी पडतात, गोड फळे खायला देतात, गार जागा राहायला देतात. त्यांनी झाडांची फळे खाल्ली. त्यांच्या बिया दुसरीकडे नेल्या. तिकडच्या मातीत त्या रुजल्या. आणखी झाडे तयार झाली. आनंदाने डोलू लागली. डोंगरदादाचा एकटेपणा संपला. तो अगदी आनंदून गेला.
मग काय झाले, डोंगरदादाजवळ ढग आले. डोंगरदादाने त्यांना जवळ घेतले. अंगाखांद्यावर आंजारले, गोंजारले, खेळवले. ढगांना खूप आनंद झाला. त्यांच्यातून पाऊस पडायला लागला. ढग गडगडले आनंदाने, झाडे भिजली पावसाने. पाऊस पडला धो धो धो, जंगल हसले खो खो खो. डोंगरदादा गाऊ लागला, जंगलाने मग ताल धरला.
या पक्ष्यांनो या सगळे
खुशाल खा या गोड फळे
मधुर मध हा फुलांतला तुमच्यासाठी साठवला
पाऊस भरपूर पडायला
जंगल हवे राखायला.
लेखक - श. त्र्यं. पाटील
धडा - डोंगर दादा





No comments:

Post a Comment