Monday, November 10, 2025

गांधी मरत नाही ही समस्या आजही कायम आहे.



ब्रिटीश पंतप्रधान चर्चिल गांधीजींना पाण्यात पहायचा. एकवीस दिवसांच्या उपोषणा दरम्यान गांधी नक्कीच मरून जातील असा त्याला विश्वास होता. नवव्या दिवसानंतर गांधी जिवंत आहेत म्हणल्यावर त्यानं भारतात व्हाईसरॉयला तार केली की गांधी पाण्यातून ग्लुकोज घेतात का याची खातरजमा करा. व्हाईसरॉयनं रिपोर्ट दिला की तसं अजिबात काहीच गांधी करत नाहीत.
विशेष म्हणजे इकडे गांधी उपोषणात असतांनाच चर्चिलही ॲडमिट होते आणि त्याकाळी अशक्य समजला जाणारा न्युमोनियानं ग्रस्त होते पण तरीही 'म्हातारा मरण्याची कोणतीही शक्यता आता दिसत नाही' अशा तारा भारतात इंग्रज प्रशासनाला करत होता.
गांधीजींना राजानं बकिंगहॅम पॅलेसमध्ये चहापानासाठी बोलवलं. गांधीजी पंचा नेसून जाणार म्हणल्यावर चर्चिलनं मुक्ताफळं उधळली. निर्धाराप्रमाणे गांधीजी पंचा नेसून गेले. बकिंगहॅम पॅलेस बाहेर ब्रिटीश माध्यमांनी गर्दी केली होती. पत्रकारानं विचारलं 'श्रीमान गांधी, या अशा दरिद्री वेषात तुम्ही राजाला भेटणार? तुमच्याकडे यापेक्षा अधिक कपडे नाहीत'?
गांधी त्यांचं जगप्रसिद्ध हास्य चेहर्‍यावर आणून मिश्कीलपणे म्हणाले 'मला आणि राजाला दोघांनाही पुरतील एवढे कपडे राजानं घातलेले आहेत!'
वरवर बघता एक विनोद पण अंतर्यामी शोषणाची सल सांगणारं हे वाक्य.
पहिल्यांदा ब्रिटीश पार्लमेंट आतून पाहिली तेव्हा तिच्याकडे रोखून पाहणारा कमरेवर हात ठेवलेला चर्चिलचा पुतळा पाहिला. पार्लमेंट स्ट्रीटवर आपला म्हातारा कणखरपणा दाखवत पुतळ्यातून उभा आहे.
मनात विचार आला की चर्चिलचा पुतळा तर दुसरं महायुद्ध जिंकलं म्हणून उभारला पण आमचा म्हातारा तर युद्धविरोधी, एकही युद्ध न लढता प्रेमानं जग जिंकणारा, त्याचाही पुतळा उभारला आहे. युद्धापेक्षा प्रेम श्रेष्ठ असल्याचा हा पुरावा.
बाकी ज्यानं आपलं साम्राज्य उधळून लावलं त्याचाही पुतळा आपल्या संसदेच्या आवारात लावणाऱ्या ब्रिटीशांच्या गुणग्राहकता आणि खिलाडू वृत्तीचीही दाद दिली पाहिजे.
आणि हो, गांधी मरत नाही ही समस्या आजही कायम आहे.



No comments:

Post a Comment