A message in its most general meaning is an object of communication. It is something which provides information or message; it can also be this information or message itself.
Tuesday, April 14, 2026
एकाच्या मते
२०१३ नंतरच्या ट्रोल गॅंगचे खरं तर व्यक्तिशः आपल्यावर खूप उपकार आहेत. त्याआधी गांधी, नेहरू, पटेल, बोस, नत्थू, सावरकर यांच्याबद्दल आपल्याला आज जी माहिती आहे ती एवढी अजिबात नव्हती. हे खरे आहे की शालेय पुस्तकात आणि नंतरही एवढेच माहित होते की गांधी-नेहरू-पटेल-बोस हे मोठे स्वातंत्र्ययोद्धे होते. सावरकर हे मोठे क्रांतिकारक होते आणि त्यांनी अंदमानात खूप यातना भोगल्या. नत्थूची वासलात तर मला आठवते त्याप्रमाणे, "एका माथेफिरूने गांधीजींवर गोळ्या झाडल्या" एवढ्या वाक्यात केलेली असायची. शाळेतील वय तर असेच असते की टिंगल-टवाळी करण्यात मजा जास्त येते. त्यात गांधीजी तर त्यांचे टक्कल, कृश देहयष्टी, अर्धनग्न शरीर, यामुळे टिंगलीचे प्राईम टार्गेट असायचे. त्यांच्या फोटोला विग आणि काळा गॉगल वगैरे रंगविलेला मला आठवतो. त्या तुलनेत सशस्त्र क्रांतिकारक हे आयकॉन वाटायचे. गांधीजींची अहिंसा हा थट्टेचा विषय वाटायचा. त्यापेक्षा इंग्रजांना गोळ्या घालणारे क्रांतिकारक हे महान वाटायचे. जिथे सगळे संस्थानिक आपापल्या सैन्यानिशी १८५७ ला ईस्ट इंडिया कंपनीशी लढून हरले, तिथे काही सशस्त्र क्रांतिकारक ईस्ट इंडिया कंपनीच्या तुलनेत शेकडो पट प्रबळ असलेल्या ब्रिटिश साम्राज्याशी कसे जिंकणार होते याचा विचार करण्याचे ते वय नव्हते. खरं सांगायचं तर जे लोक जास्त सखोल वाचन करीत नाहीत, ते आजही काही इंग्रज अधिकाऱ्यांवर सशस्त्र हल्ले आणि करोडोंचे जनआंदोलन यातला फरक न कळण्याच्या त्याच शालेय पातळीवर असतात.
२०१३ नंतर मात्र एक वेगळेच पर्व सुरु झाले आणि गांधी-नेहरू यांना पद्धतशीर टार्गेट करण्याचे प्रयत्न सुरु झाले. त्यासाठी एक प्रचंड मोहीमच राबविण्यात आली आणि ती आजही सुरु आहे. अनेक लोकांवर त्याचा उलटाच परिणाम झाला, आणि मी त्यातीलच एक आहे.
गांधीजींची अहिंसक चळवळ म्हणजे मूर्खपणा होता असे आरोप झाल्यावर त्याचा इतिहास वाचावा लागला आणि तुरळक हिंसक कारवाया करून फासावर जाणाऱ्या क्रांतिकारकांचे वैयक्तिक बलिदान आणि करोडो लोकांचे अहिंसक आंदोलन शिस्तबद्धपणे चालविणाऱ्या गांधीजींच्या कार्यपद्धतीमधील आणि अंतिम परीणामातील फरक लक्षात आला. खरे तर अहिंसक आंदोलनातील लोकांचे बलिदान काही कमी नव्हते, हे बाबू गेनू, शिरीषकुमार, जालियनवाला बागेतील शेकडो बळी आणि अशा शेकडो उदाहरणावरून दिसेलच. पण १९४२ ची एक चळवळ घेतली, तरी त्यात १०,००० पेक्षा जास्त लोक (अगदी जमावावर विमानातून गोळीबार होऊन देखील) बळी गेले होते,. हे बलिदान नव्हते का? असे प्रश्न पडायला लागले.
गांधीजींना आयुष्यात प्रथम "महात्मा" म्हणणारे रवींद्रनाथ टागोर होते, त्यांना सिंगापूर रेडिओवरून "राष्ट्रपिता" प्रथम म्हणणारे नेताजी बोस होते, सरदार पटेल गांधीजींचे एवढे भक्त होते की ते तुरुंगात गांधीजींचे कपडे स्वतः धुवायचे, या गोष्टी आधी कुठे माहित होत्या?
नेहरू हे मुस्लिम होते हा प्रचार वाचल्यावर नेहरू खानदानाची १८५७ आधीपासूनची माहिती वाचणे भाग पडले. मोतीलाल नेहरू यांची अमाप संपत्ती, पंडित नेहरूंचे एखाद्या राजपुत्रासारखे व्यतीत झालेले बालपण, त्यांचे शालेय ते बॅरिस्टर होईपर्यंतचे इंग्लंडमधील शिक्षण, ते सगळे वैभव सोडून देऊन त्या पिता-पुत्रांचे भणंग आयुष्य स्वीकारणे, त्यांचे आई-वडील-बहीण आणि इतर नातेवाईकांसोबत कारावास सोसणे, त्यांची १६ वर्षाची आधुनिक भारताची पायाभरणी, त्यांचे हिंदू कोड बिलासारखे आधुनिक कायदे पारित करून स्त्रियांसाठी केलेले कायमचे काम, त्यांचे कामगारांसाठीचे कल्याणकारी कायदे, हे खऱ्या अर्थाने मागील आठ वर्षात माहित झाले. त्यासाठी ट्रोल आर्मीचे आभारच मानले पाहिजेत.
सावरकरांबद्दल बोलायचे, तर वास्तविक सावरकरांची जेवढी बदनामी मागील आठ वर्षात झाली, तेव्हढी मागील ७५ वर्षात झाली नव्हती. त्यालाही ट्रोल गँगचं जबाबदार आहे. त्यांनी गांधी-नेहरूंना टार्गेट केल्यावर, त्याची प्रतिक्रिया म्हणू,न त्यांच्या विरुद्ध पक्षाने अनेक गोष्टी पुढे आणल्या. त्यात सावरकरांची ७ माफीपत्रे, त्यांना मिळणारी पेन्शन, त्यांनीं जिनांबरोबर संयुक्त मंत्रिमंडळ स्थापन करणे, त्यांचे शिष्य व बंगालचे मुख्यमंत्री शामाप्रसाद मुखर्जींनी १९४२ ची चळवळ दडपून टाकण्यासाठी ब्रिटिश गव्हर्नरला लिहिलेली पत्रे, त्यांनी त्रवणकोरच्या संस्थानिकाला भारतात सामील न होता स्वतःचे स्वातंत्र्य जाहीर केल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी केलेला टेलिग्राम, आदी गोष्टींचा समावेश होता. गांधी खून खटल्याबाबतचे त्यांच्याबद्दलचे तपशील बाहेर काढले गेले. खरे तर त्याआधी सावरकरांबद्दल एक ज्वलंत क्रांतिकारक म्हणून केवळ प्रचंड आदरच होता, या इतर गोष्टी कोणाला माहीतच नव्हत्या. त्या आदराला तडा ट्रोल गॅंगमुळे गेला. नत्थूबद्दल बोलायचे तर गांधीजींचा खून फक्त फाळणी आणि ५५ कोटींसाठी झाला यावर माझा ठाम विश्वास होता. पण १९२४ पासून याच लोकांनी अनेक वेळा (६ वेळा) गांधी-हत्येचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळी तर पाकिस्तान, फाळणी हे शब्दही कोणाला माहित नव्हते हे कळल्यावर त्याबाबत अधिक वाचन करावे लागले. आणि त्यामुळे गांधी-हत्येची थिअरी किती बोगस आहे ते कळले. याचे श्रेयही ट्रोल आर्मीचेच!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment