Saturday, August 21, 2021

व्यवसाय साक्षर व्हा...

 पैशासाठी बिजनेस करायचा नसतो असं म्हटलं कि बऱ्याच जणांचं पित्त खवळतं. अस्मितेला धक्का लागला असावा अशा प्रकारे चिडचिड होते. आपण ज्या ज्या प्रकारे विचार करतोय त्याच्या अगदीच विरुद्ध कुणी विचार करतोय म्हटल्यावर तो कसा मूर्ख आहे हे सांगण्याची प्रचंड इच्छा होते, आणि ती व्यक्त केली जाते सुद्धा... २०-२५ वयाची मुलं स्टाईल मधे पैसा है तो सबकुछ है असा डायलॉग मारतातच... पण तिशीनंतर, पैसा तर मिळतोय पण तरीही समाधान लागत नाहीये, नक्की चुकतंय कुठं, असाही प्रश्न पडायला लागतो...

व्यवसाय पैशासाठी करायचाय ? मग व्यवसायच का? नोकरी पण करू शकता कि.... नोकरीमध्येही अशा कित्येक संधी आहेत जिथे महिन्याला १०-२० लाखाचे पॅकेज मिळू शकते. व्यवसायात संपुर्ण आयुष्य गेलेल्या कित्येकांना आजही एवढे उत्पन्न वर्षाला सुद्धा मिळत नाही. मग व्यवसाय हा पैशासाठीच केला जतो हा गैरसमज नाही का? सामान्यपणे आपण आसपासचे लोक काय बोलतात यावरून आपली मते ठरवत असतो. व्यवसायाच्या बाबतीतही असेच आहे. खास मोटिव्हेशनल लेक्चर्स ऐकून तर पैसा कमावण्यासाठीच व्यवसाय करायचा असतो हे आपल्या डोक्यात घट्ट बसलेलं असतं... पण खरं सांगतो व्यवसाय पैशासाठी करत नसतात... पैसा हा व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे, आपण ज्यावेळी व्यवसाय यशस्वी करण्यासाठी धडपडतो तेव्हा पैसा आपोआपच आपल्याकडे यायला लागतो. तो मिळावा यासाठी धडपड करायची गरज नसते. तो आपोआपच येतो...
मग, व्यवसाय का करायचा ? व्यवसाय करायचा असतो तो स्वातंत्र्यासाठी...
व्यवसायातून आपल्याला स्वातंत्र्य मिळतं... निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, विचार करण्याचं स्वातंत्र्य, आपलं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य,भविष्य पाहण्याचं स्वातंत्र्य, भविष्य आपल्या मनाप्रमाणे घडवण्याचं स्वातंत्र्य, वेळेचा वापर करण्याचं स्वातंत्र्य, आपल्या संकल्पनांवर काम करण्याचं स्वातंत्र्य, आपला मार्ग तयार करण्याचं स्वातंत्र्य... हे स्वातंत्र्य आपल्याला व्यवसायातून मिळतं. या स्वातंत्र्यासाठी आपल्याला व्यवसाय करायचा असतो... आपला खरा विकास या स्वातंत्र्यातूनच होत असतो. फक्त पैशातून विकास होत नाही .पैशाने फक्त इमारती उभ्या राहू शकतात, त्यात समाधानाने राहण्यासाठी स्वातंत्र्य महत्वाचं असतं.
पैसा हा व्यवसायाचा परिणाम आहे... तो मिळतोच... पण पैशाला कधीच साध्य समजायचं नसतं, ते साधन असतं... आपल्या अनेक साधनांपैकी एक साधन आहे आपलं स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचं... त्याला साध्य समजून वाटचाल केली तर त्यातून फक्त नैराश्य हाती येतं, कारण ते कधीच हाती ना लागणारं साध्य ठरण्याचीच शक्यता जास्त असते. तुम्हाला पैसा कमवायचा आहे, मग तुम्ही व्यवसाय यशस्वी करण्याकडे लक्ष द्या. दररोज उत्पन्नाची आकडेवारी मांडत बसाल तर आपले उद्दिष्ट साध्य का होत नाहीये या विचाराने नैराश्यात जाल. नैराश्यात गेलात कि आपोआपच बिजनेस बंद पडणार आहे... काय फायदा झाला? आता तुम्ही ग्राहक जास्तीत जास्त कसे वाढतील याकडे लक्ष द्या, ग्राहक वाढले कि नफा आपोआपच वाढणार आहे, म्हणजेच पैसा वाढत जाणार आहे. ग्राहकच पैसे घेऊन येत असतो.
वयाच्या किशी-चाळीशीनंतर नंतर बरेच जण पैसा मिळतोय पण समाधान का नाही, असा जेव्हा विचार करतात, त्यामागे हेच कारण असतं. त्यांनी पैशाला साध्य समजून काम केलेलं असत, आणि ते साध्य साधण्याच्या नादात स्वातंत्र्य गमावलेलं असतं..
व्यवसाय पैशासाठी करायचा नसतो म्हणजे पैसा कमवायचा नसतो असं नसतं, किंवा पैशाला तुच्छ लेखण्याचा प्रयत्न नसतो, तर व्यवसााचा खरा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न असतो.
पैसा मलाही हवाय, अगदी कित्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप सारा पैसा हवाय, जो अजूनही आवाक्याबाहेर आहे. पण त्यामुळे मला नैराश्य येत नाही... कारण माझं मुख्य साध्य आहे स्वातंत्र्य... ते मी मिळवलेलं आहे. वेळेअभावी माझं काही काम राहतंय असं मला वाटत नाही, मला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही असं मला कधीच वाटत नाही, मला माझ्या मनाप्रमाणे जगता येत नाहीये असं मला कधीच वाटलं नाही, याच कारण मी व्यवसायात पदार्पण करून स्वातंत्र्य मिळवलं आहे... हे स्वातंत्र्य मी टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करतोय... हे स्वातंत्र्य टिकवून, मला जो पैसा मिळेल त्यातून माझी स्वप्ने पूर्ण करणार आहे... म्हणजे मी स्वातंत्र्य उपभोगत, आणि माझी स्वप्नेसुद्धा पूर्ण करण्यासाठी झटतोय... आपलं अंतिम उद्दिष्ट हे समाधानी आयुष्य जगण्याचे असावे... हे समाधानी आयुष्य व्यवसायातून आलेल्या स्वातंत्र्यामुळे मिळतं...
मी आजघडीला मला वर्षातून जास्तीत जास्त १०० दिवस काम करायचं आहे या दृष्टिकोनातून माझी लाइफस्टाइल तयार करत आहे. मी माझं स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत ऑफिसमध्ये बसून काम करण्यात मला बिलकुल स्वारस्य नाहीये. तेच करायचं असतं तर मग मी नोकरी केली असती. विना टेन्शन पैसे मिळाला असता. पण मी माझं स्वातंत्र्य गमावलं असतं... हि माझी स्वातंत्र्याची व्याख्या आहे. प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते.
पैसा कमवा भरपूर कमवा, पण ते व्यवसायाचे साध्य नाही हे लक्षात ठेऊन कमवा. व्यवसायाचं अंतिम ध्येय्य हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच आहे हे लक्षात असू द्या. व्यवसाय मोठा करण्यासाठी प्रयत्न करा. व्यवसाय ग्राहकांनी मोठा होतो. पैसा ग्राहकांसोबत आपोआपच येतो....
व्यवसाय साक्षर व्हा...
_
© श्रीकांत आव्हाड

No comments:

Post a Comment