Saturday, February 26, 2022

अध्यात्मिकांची बुवाबाजी (मनोगते)


साधारणपणे स्वामी समर्थ, गुळवणी महाराज, काडसिद्धेश्वर महाराज, टेंबे स्वामी, गजानन महाराज, पिठले महाराज, शिर्डीचे साईबाबा, यांच्या ठोस जन्म तारखेविषयी कोणी भक्तगँग सांगू शकेल काय?
ज्ञानेश्वर, तुकाराम, गाडगेबाबा, तुकडोजी या संतांच्या जन्म तारखा, ग्रंथ, त्यांचे साहित्य, त्यांचे प्रबोधन कार्य याचे पुरावे उपलब्ध आहेत. महावीर, गौतम बुद्ध, शंकराचार्य, मोहम्मद पैगंबर, गुरू नानक, येशू ख्रिस्त यांचे पण जन्मदिवस, ग्रंथ, त्यांचे कार्य त्यांच्या कार्याचा चिकित्सक अभ्यास उपलब्ध आहे.
तुकारामांचे आडनाव अंबिले होते. देहू येथील ते सावकार होते, वगैरे व्यवहारिक माहिती आहे. भास्कराचार्यांनी शून्याचा शोध लावला, याचे दाखले आहेत.
पण...
या तथाकथित महाराज, स्वामींनी काय केले? स्वामी समर्थ यांच्याविषयी पोथी व्यतिरिक्त कोणताही पूरावा नाही. स्वामी समर्थांचे मूळ नाव, आई वडिल असा कोणताही उल्लेख कुठेही
नाही. ते करदळीवनात प्रगटले म्हणे! ही गोष्ट पूर्णपणे अनैसर्गिक म्हणून धादांत खोटी आहे. स्वामी समर्थांचा कालखंड साधारण १८६० ते १९३० असा काहीसा असावा, कारण पोथीमधे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके त्यांना एकदाच भेटल्याचा उल्लेख आहे. स्वामी समर्थांचे कार्य काय हा समाजशास्त्रीय प्रश्न आहेच. त्यांनी एक जागा/भूखंड पिशाच्च मुक्त केला. मुळात अतिंद्रिय शक्ती, मेल्यानंतरचा आत्मा वगैरे काही अस्तित्वातच नसते. त्यामुळे जागा पिशाच्चमुक्त केली, हे थोतांड आहे. क्षणभर सत्य मानले तरी प्रश्न येतो की, जागा पिशाच्च मुक्त केली; तर देश इंग्रजमुक्त का केला नाही? इंग्रज ही माणसे होती, म्हणजे पिशाच्चापेक्षा कमी शक्तिशाली.
क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थांना भेटायला गेले हे पण काल्पनिक वाटते. कारण फडके भेटायला गेल्याचा उल्लेख फक्त पोथीत आहे. तो काही ऐतिहासिक दस्तऐवज म्हणता येत नाही. तरीपण मान्य करु की, फडके स्वामी समर्थांना भेटले, आणि फडके म्हणाले की, स्वातंत्र्यासाठी फडक्यांनी लढायचे ठरवले आहे. त्यावर स्वामींनी त्यांना आत्ता लढून उपयोग नाही, स्वातंत्र्याची वेळ आली नाही, असे सांगितले म्हणे! हेही त्या पोथीत आहे.
आता प्रश्न येतो की,
१) जर वेळ आल्यावर लढायचे म्हणजे १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले, मग १९४६ पासून लढायला पाहिजे होते का?
२) वेळ आल्यावर स्वातंत्र्य मिळेल, मग लढायचे तरी कशाला?
हाच प्रश्न पिठले महाराज, गुळवणी महाराज, काड सिद्धेश्वर महाराज यांच्याबाबत येतो. या बाबा लोकांनी म्हणे कुंडलिनी जागृत केली! मुळात आधुनिक वैद्यक शास्त्रात कुंडलिनी वगैरे काही अस्तित्वात नसतेच. शरीर रचनाशास्त्र यात अंत्य नाडी, कुंडलिनी याचा उल्लेख नाही. तरीपण मान्य करु की, कुंडलिनी जागृत केली. पण उपयोग काय? जीवनाच्या कोणत्या क्षेत्रात हे भरीव कार्य झाले, ज्यामुळे मानवी समाज प्रगतीच्या पुढच्या टप्पयावर गेला...?

No comments:

Post a Comment