दख्खनचा काळापहाड — मलिक अंबर



इतिहास हा फक्त राजे-महाराजांचा नसतो…
तो त्या असामान्य व्यक्तींचाही असतो, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या कर्तृत्वाने इतिहासावर अमिट ठसा उमटवला.असाच एक विलक्षण इतिहासपुरुष म्हणजे मलिक अंबर!
इ.स. १५४८ च्या सुमारास आफ्रिकेतील इथिओपिया प्रदेशात आरोमा जमातीत जन्मलेलं एक बालक…
गरिबी, दुष्काळ आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे गुलाम म्हणून विकलं जाते “चापू” नावाचा तो मुलगा पुढे दख्खनच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक बनेल, याची कल्पनाही कुणाला नव्हती.
बालपणापासूनच त्याने अपमान, गुलामी, बेड्या आणि माणसांच्या बाजाराचा क्रूर चेहरा अनुभवला.एका देशातून दुसऱ्या देशात गुलाम म्हणून फिरताना त्याने जग आणि जगदारी जवळून पाहिली.
बगदाद येथे मीर कासिम अल बगदादी याने त्याला विकत घेतले.तेथे इस्लाम धर्माची दीक्षा घेऊन त्याने “अंबर” हे नाव धारण केले.
इस्लामने त्याला केवळ नवं नाव दिलं नाही…
तर ईमान, संयम, न्याय आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद दिली.अल्लाहवरील श्रद्धा आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर तो पुढे निजामशाहीतील प्रभावशाली मुत्सद्दी, सेनानी आणि वजीर बनला.
त्या काळात मुघल साम्राज्य दख्खन जिंकण्यासाठी सतत प्रयत्न करत होते.अकबर आणि पुढे जहांगीर यांची दक्षिण जिंकण्याची महत्त्वाकांक्षा प्रचंड होती.
पण ज्या मुघल सामर्थ्याला संपूर्ण उत्तर भारत रोखू शकला नाही, त्या साम्राज्याला दख्खनमध्ये अनेक वर्षे रोखून धरणारा योद्धा म्हणजे मलिक अंबर!
गुलाम म्हणून आयुष्य सुरू केलेल्या या माणसाने स्वतःच्या पराक्रमावर सहा हजार घोडेस्वारांचे सैन्य उभे केले.मराठा सरदारांचे हलके घोडदळ, वेगवान हालचाली, डोंगरदऱ्यांचा अभ्यास आणि छापामार तंत्र यांचा वापर करून त्यांनी “गनिमी कावा” अधिक प्रभावी केला.
पुढे हाच लढाऊ वारसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य लढ्यात अधिक प्रगल्भ स्वरूपात दिसून येतो.
मलिक अंबर यांच्या सैन्यात अनेक मराठा सरदार कार्यरत होते.शहाजीराजे भोसले आणि मलिक अंबर यांचे राजकीय व लष्करी संबंध निकटचे होते. काही लोकपरंपरा आणि अभ्यासकांच्या लिखाणात जिजाऊ-शहाजीराजे विवाहात मलिक अंबर यांच्या भूमिकेचा उल्लेख आढळतो; मात्र याबाबत ठोस समकालीन ऐतिहासिक पुरावे मर्यादित आहेत.
मलिक अंबर हे फक्त रणांगणातील योद्धे नव्हते…
ते एक कुशल प्रशासक, अर्थतज्ज्ञ आणि लोककल्याणकारी शासकही होते.त्यांनी महसूल व्यवस्थेत सुधारणा केल्या, जमिनीचे मोजमाप करून करपद्धती अधिक संघटित केली.शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला.
औरंगाबाद परिसरातील “नहर-ए-अंबरी” ही पाणीपुरवठा योजना त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देते.त्या काळातील ही एक अत्यंत प्रगत जलव्यवस्था मानली जाते.खडकी हे शहर वसवून त्यांनी त्याचा विकास केला. पुढे त्याच शहराला औरंगाबाद म्हणून ओळख मिळाली. आणि सध्या छत्रपती संभाजीनगर म्हणून हे शहर दिमाखात उभे आहे.
इतिहासात अनेक राजे झाले…
पण गुलाम म्हणून विकला गेलेला एक आफ्रिकन तरुण आपल्या बुद्धिमत्ता, पराक्रम, मुत्सद्देगिरी आणि नेतृत्वाच्या बळावर दख्खनचा “काळापहाड” बनतो, ही घटना जगाच्या इतिहासात अद्वितीय आहे.
मलिक अंबर आपल्याला शिकवतात
माणसाचा जन्म त्याला महान बनवत नाही…
तर त्याचा संघर्ष, स्वाभिमान आणि कर्तृत्व त्याला इतिहासात अजरामर बनवते!
त्या दख्खनच्या शूर योद्ध्याला, त्या बहुजननायकाला विनम्र अभिवादन!





No comments:

Post a Comment